आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप म्हणते युतीनेच लढू, शिवसेनेकडून मात्र इन्कार;शिवसेनेला गाेंजारण्याचे प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत असूनही रोज भारतीय जनता पक्षावर टीका करत असते. सत्तेतून बाहेर पडण्याचे अनेक वेळा इशारे यापूर्वी शिवसेनेने दिलेले आहेत. एवढेच नव्हे, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली आहे. तरीही बुधवारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना आगामी निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रच लढेल, असे सांगून अापल्या मित्रपक्षाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवसेनेने मात्र मुनगंटीवार यांचा हा प्रस्ताव साफ फेटाळून लावला अाहे.  


गुजरातपाठाेपाठ उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या लाेकसभा पाेटनिवडणुकीत माेठा झटका बसल्यानंतर भारतीय जनता पक्ष ताळ्यावर अाला अाहे. गेली चार वर्षे राज्यात आणि केंद्रातील सत्तेत शिवसेनेला दुय्यम वागणूक देणाऱ्या भाजपला अाता पुढील निवडणुकांत शिवसेनेसाेबत युतीची गरज भासू लागली अाहे, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 


विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले, ‘हे शिवसेना-भाजपचे सरकार अाहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी आगामी निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रच लढवेल. राज्यातील जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ. शरद पवार यांनी काँग्रेसविरोधात खूप काही वक्तव्ये केलेली आहेत. मागील निवडणुका काँग्रेस- राष्ट्रवादी वेगळे लढले तरीही आता तुम्ही अाता एकत्र येत आहात. शिवसेनेचे मुखपत्र जास्त वाचू नका. त्यामुळेच तुमचा गोंधळ उडाला आहे,’ असा टाेला त्यांनी विराेधकांना उद्देशून लगावला. 
दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही अामचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काही शिवसेनेचे ‘प्रवक्ते’ नाहीत, असे 
प्रत्त्युत्तर दिले.

 

‘विराेधकांच्या धसक्याने भाजपला शिवसेनेची गरज’

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणाला, ‘या विषयावर खरे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच बोलतील. परंतु उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीतील दोन्ही जागांवर भाजपचा पराभव झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. आज गोरखपूरमध्ये भाजपचा जो पराभव झाला त्यामुळे कदाचित त्यांना आमची आवश्यकता भासत असावी. काँग्रेस मोदींविरोधातील सर्व पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला ठाऊक आहे, अाता स्वबळावर ते सत्ता स्थापन करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आमची गरज लागणारच आहे. म्हणूनच अर्थमंत्री युतीची भाषा करत असावेत. मात्र अामचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील.’

बातम्या आणखी आहेत...