Home | Maharashtra | Mumbai | SRA Wishwas patil inquiry through CID- minister waikar

SRA घोटाळा: विश्वास पाटलांची सीआयडीमार्फत चौकशी होणार, विधानसभेत घमासान

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 13, 2018, 04:05 PM IST

गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानसभेत आश्‍वासन

  • SRA Wishwas patil inquiry through CID- minister waikar

    मुंबई- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) माजी मुख्याधिकारी विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल महिन्याभरात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत दिले.


    विधानसभा सदस्य शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवा निवृत्तीच्या अखेरच्या कालावधीत मान्यता दिलेल्या 137 प्रकरणांपैकी 33 प्रकरणात गैरप्रकार व अनियमितता आढळून आल्या प्रकरणी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला. जुहूतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत दोन अलिशान सदनिका मिळवून गैरव्यवहार केल्याचेही आढळून आले. या प्रकरणातील महत्वाची ङ्गाईल प्राधिकरणातून गहाळ झाल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात 30 नोव्हेंबर 2017 रोजी गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

    विश्वास पाटील यांच्या कार्यकाळातील जून 2017 मध्ये त्यांनी निकालात काढलेल्या सर्व 137 प्रकरणांची सखोल तपासणी करण्यासाठी 4 सदस्य समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवालही शासनाला सादर केल्याची माहिती गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वायकर यांनी सभागृहाला दिली. परंतु सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल महिन्याभरात सभागृहात सादर करण्यात येईल, असे आश्‍वासन वायकर यांनी यावेळी दिले.

    तर विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी 137 प्रकरणांपैकी 33 प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आल्याने त्यांची चौकशी स्वत: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव यांच्यामार्फत करण्यात येत असल्याने यात निष्पन्न काय होणार? अशी शंका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली. या सर्व 33 प्रकरणांची सविस्तर माहिती सादर करणार का? असा प्रश्‍न विधानसभा सदस्य सुनिल प्रभू यांनी उपस्थित केला. त्यानुसार या सर्व 33 प्रकरणांची सविस्तर यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिले. तसेच कुटें समितीचा अहवालही सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन वायकर यांनी आमदार राजेश टोपे यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिले.

  • SRA Wishwas patil inquiry through CID- minister waikar

Trending