आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ST कर्मचाऱ्यांचा अघाेषित संप; 80 अागारांतील बससेवा पूर्णपणे ठप्प प्रवाशांचे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकत्याच झालेल्या वेतनवाढीवर असमाधानी असलेल्या राज्यभरातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अघाेषित संप सुरू केला. त्यामुळे राज्यातील सुमारे ८० अागारांतून एकही बस बाहेर पडू शकली नाही, तर अनेक बसस्थानकांतील बससेवा विस्कळीत झाली हाेती. त्याचा लाखाे प्रवाशांना फटका बसला. एसटीचाही सुमारे १५ कोटी महसूल बुडाला.

 

दरम्यान, एकाही संघटनेचा पुढाकार नसलेल्या या अांदाेलनातून तोडगा काढण्याबाबत चर्चा नेमकी कोणाशी करायची याबाबत आम्ही संभ्रमात आहोत, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली. कर्मचारी संघटनांच्या चिथावणीला बळी पडून गैरसमजावर आधारित या संपात कामगारांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन करतानाच सामान्य कामगारांचे संसार उद्ध्वस्त होऊ नयेत यासाठी त्यांना ‘मेस्मा’ लावणार नसल्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचेही रावते म्हणाले.

 

कर्मचारी वेतनवाढीवर नाखुश असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून अघोषित संपाला सुरुवात केली आहे. या संपाला राज्यभरात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला असून राज्यभरात परिवहन सेवा ठप्प असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी महामंडळाच्या बसगाड्यांचे संपकऱ्यांनी नुकसान केल्याच्या घटना घडल्या असून महामंडळ प्रशासनाने स्थानिक स्तरावर कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अस्त्र उगारले आहे. याबाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी दिव्य मराठीने संपर्क साधला असता, संपाचे पालकत्व कोणत्याही संघटनेने घेतलेले नसल्याने नेमकी चर्चा कुणाशी करावी, याबाबत आम्ही संभ्रमात आहोत. यापूर्वी न्यायालयानेही दणका दिल्याने छुप्या पद्धतीने हा संप पुकारण्यात आला आहे. मात्र कामगार संघटनांच्या चिथावणीला कामगारांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
अाैद्याेगिक न्यायालयात दाद मागा : रावते  


रावते म्हणाले की, ‘कर्मचाऱ्यांनी अगोदर वेतन स्वीकारावे, मग आंदोलनाचा निर्णय घ्यावा. वेतनवाढीबाबत असमाधानी असल्यास औद्याेगिक न्यायालयात दाद मागणे हा पर्याय आहे, संप हा त्यावरील उपाय नव्हे. अांदाेलक कर्मचाऱ्यांवरील कारवाई स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीत येते. त्यात माझा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे कारवाईबाबत मला माहिती देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

 

मेस्मा लावणार नाही : रावते

परिवहन महामंडळाच्या सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा विचार आहे का, या प्रश्नावर रावते यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘संघटनांचे पदाधिकारी स्वार्थासाठी संप घडवून आणतात. त्यामुळे मेस्मांतर्गत कारवाई करून मला सामान्य कर्मचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करायचे नाहीत. मागील दोन संपांतही मी मेस्मांतर्गत कारवाई केली नाही. गेल्या दीड वर्षापासून मेस्माची फाइल माझ्याकडे पडून आहे. मेस्मांतर्गत कारवाई होणार नसल्याचा विश्वास वाटू लागल्यानेच बहुधा संप पुकारून मनमानी केली जात आहे का, असा सवालही त्यांनी केला.

 

जालना, बीडमध्ये कर्मचारी निलंबित 

जालना विभागातील २९ चालक-वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक कार्यालयातून सांगण्यात आले. तर बीड विभागातील १२१ कर्मचाऱ्यांवर अशीच निलंबनाची कारवाई करण्यात आली. याचे पडसाद बीड, माजलगाव, गेवराई, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, पाटोदा, आष्टी या आगारांत दिसून आले. माजलगाव, धारूर, गेवराई, अंबाजोगाईत शंभर टक्के संप झाला. बीडमध्ये मात्र संघटनांमध्ये फूट पडल्याने संमिश्र प्रतिसाद होता. विभागीय नियंत्रक गौतम जगतकर यांनी जिल्ह्यातील ३८ चालक, ३६ वाहक, १ वाहन परीक्षक व अंबाजोगाई, धारूर व पाटोदा वाहतूक नियंत्रकांनाही निलंबित केले.


एसटीचा दावा 

३५ हजारांपैकी १० हजार फेऱ्या सुरळीत : राज्यभरात विविध ठिकाणी संपकरी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली याबाबत परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यभरात काही ठिकाणी कारवाई झाल्याचे वृत्त आहे.  

दिवसभरात २५० आगारातून सुमारे ३० % बसच्या फेऱ्या सुटल्या. राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच १४५ आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तसेच राज्यातील ८० आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही.

 

या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भात  ६०% वाहतूक सुरळीत सुरू होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या ३५,२४९ बसफेऱ्यांपैकी १०,३९७ फेऱ्या सुरळीत सुरू होत्या.   

 

अात्मदहन प्रयत्नाचा दावा
प्रशासन कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई करणार असेल तर एसटी कर्मचारी संघटना कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील. चर्चेने प्रश्न सोडवण्याची आमची तयारी आहे, मात्र दडपशाही सहन केली जाणार नाही. परळ आगारात आमच्या एका कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावरून संपाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात येईल, अशी आशा आहे.  


-संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, 
-हनुमंत ताटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना,

 

बातम्या आणखी आहेत...