आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानातील क्रांती देणार आता वैद्यकीय शिक्षणात धडे, डॉक्टरांना उपचार-शस्त्रक्रिया होतील सुलभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आतापर्यंत आपण हॉलीवूडच्या चित्रपटांत ‘३डी होलोग्राम’च्या मदतीने अनेक चमत्कृती पाहिल्या. या तंत्रज्ञानाने एखादा कलाकार कुठेही अवतरून काम करताना आपण पाहिला होता. नंतर राजकारणातही याचा वापर सुरू झाला आणि  भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत ३डी होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच वेळेस अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. हे तंत्र केवळ चित्रपट व राजकारणापुरते मर्यादित न राहता त्याचा समाजाला कसा फायदा होईल यावर विचार केला जात होता. त्यानुसार महाराष्ट्रात प्राध्यापकांची कमतरता असल्याने नामवंत प्राध्यापकांचे लेक्चर्स ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळावे म्हणून या तंत्राचा वापर करता येईल का याचा विचार सुरू झाला आहे. विशेषत: वैद्यकीय क्षेत्रात याचा वापर क्रांतिकारी ठरू शकतो.


६८% शिक्षकांची होलोग्रामला पसंती

२०१२ मध्येच करण्यात आलेल्या अंतर्गत अभियांत्रिकी शिक्षण संशोधनात (मुंबई विद्यापीठ) असे दिसून आले की, महाराष्ट्रातील २०० महाविद्यालयांमधील २०० शिक्षकांपैकी ६८% शिक्षकांनी होलोग्रामला पसंती दर्शवली होती. परंतु, ५००० अमेरिकन डॉलर एवढा प्रचंड खर्च असल्यामुळे ही कल्पना मागे पडली. आतापर्यंत हे तंत्रज्ञान परदेशातून आणण्याच्या आणि हार्डवेअवरील शुल्कांमुळे येणाऱ्या अवाजवी खर्चामुळे होलोग्राफिक डिझाइन ही अत्यंत खर्चिक बाब होती. परंतु आता गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील एक तरुण व्यावसायिक करण भारद्वाज यांनी स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य वापरासाठी क्रिएटिव्ह सपोर्टसह स्थानिक पातळीवर विकसित केलेले होलोग्राम तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

 

प्रति कॉलेज ५०० डॉलर

२०० कॉलेजमध्ये प्रति कॉलेज ५ हजार डॉलर खर्च येतो परंतु आम्ही प्रति कॉलेज ५०० डॉलरमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत. ८० हजार रुपयांत प्रोजेक्टर आणि १५ ते २५ हजार छोट्या क्रिएटिव्हचा खर्च येतो. क्रिएटिव्ह जेवढे मोठे, प्रतिमा जितक्या जास्त तितका त्याचा खर्च वाढतो. परंतु परदेशी कंपन्यांच्या तुलनेत आपण ही सोय कमी दरात देऊ शकतो. वैद्यकीय, शैक्षणिक व जाहिरात क्षेत्रातून प्रतिसाद मिळत असल्याचे भारद्वाज म्हणाले.


वैद्यकीय क्षेत्रात फायदा

वैद्यकीय शिक्षणामध्ये होलोग्राममुळे मानवाच्या शारीरिक आंतररचना, चेतासंस्था आणि स्नायूबंध यांची तपशीलवार ३डी-४के चल प्रतिमा दिसते. त्यामुळे अशा प्रतिमांचा वापर झाल्यास मानवी मृत शरीरांची आवश्यकता भासणार नाही. या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सा प्रशिक्षणासाठी (सर्जिकल ट्रेनिंग) सिम्युलेशन देणेही शक्य  होईल. तर अभियांत्रिकीमध्ये होलोग्राममुळे लाईव्ह मेकॅनिकल प्रारूपांचा खर्च वाचतो, कॅड/कॅमचे क्लिष्ट ज्ञान नसतानाही डिझाईन करताना लवचिकता मिळते. व्यवहार्य डिझायनिंग कौशल्ये विकसित करण्यासाठीही वापर केला जाईल.


भारतात ३डी होलोग्रामची संकल्पना आणणारे मणि शंकर यांनी हैदराबाद येथून बोलताना सांगितले, राजकारणात प्रचारासाठी या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर आम्ही केला असून चित्रपटांच्या प्रमोशनसाठीही शाहरुख खान, सलमान खान यांनी याचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे देशात एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात उपचारांबरोबरच शस्त्रक्रिया करणे सोपे जाणार असून प्रशिक्षणार्थींना मृतदेह समोर नसला तरी शरिराची माहिती घेणे सोपे होईल.


काय आहे ३डी होलोग्राम तंत्रज्ञान

यात एक विशेष तंत्राने तयार केलेला प्रोजेक्टर असतो. या प्रोजेक्टरमध्ये संगणकाच्या मदतीने क्रिएटिव्ह तयार करण्यात येते. समजा आयआयटीतील एखाद्या प्राध्यापकाचे लेक्चर असेल तर ते संपूर्णपणे रेकॉर्ड करून ३डी इमेज तयार करतात. त्यानंतर कॉलेजमधील वर्गात प्रोजेक्टर लावून तेथे ती ३डी प्रतिमा अवतरित करण्यात येते. या प्रतिमेत साक्षात तो प्राध्यापक लेक्चर देत आहे असे दिसते. यात संवादाची सोयही उपलब्ध करून दिली आहे.


 शस्त्रक्रिया होतील सोप्या

अनेकदा वैद्यकीय कॉलेजमध्ये परीक्षणासाठी मृतदेह मिळत नाहीत तेव्हा या तंत्रज्ञानाच्या मदतीने शरीरातील सर्व भागांच्या ३डीआकृती हवेत निर्माण करता येऊ शकतील. या प्रतिमांना स्पर्श करणे, त्या मोठ्या करून त्यातील गुंतागुंत पाहणे शक्य होते. एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ऑपरेशन करायचे असेल तर त्याच्या हृदयाचे स्कॅनिंग करून त्याची ३डी प्रतिमा डॉक्टरसमोर  उभी करता येईल. त्यामुळे डॉक्टर्सना त्या व्यक्तीच्या हृदयाची संपूर्ण माहिती ऑपरेशनपूर्वीच उपलब्ध होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...