आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन; हायकोर्टाचे तपास यंत्रणांना खडे बोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हत्या आणि बलात्काराच्या वाढत्या घटना आणि एकूणच गुन्ह्यांच्या तपासातील तपास यंत्रणांचे औदासीन्य यामुळे  आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा मलिन होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबतच्या अशा परिस्थितीमुळे आधी गुंतवणुकीची इच्छा व्यक्त करणारे गुंतवणूकदार नंतर माघार घेतात. अशाने देशाची प्रगती कशी होणार, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सीबीआयसह शासकीय तपास यंत्रणांना खडे बोल सुनावले.

 

डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या तपासात अपयश येत असल्याच्या सीबीआय आणि विशेष तपास पथकाच्या कबुलीनंतर संतप्त झालेल्या न्यायालयाने गुरुवारी हे मत व्यक्त केले. 

 
डॉ. दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्या तपासाबाबतचा प्रगती अहवाल गुरुवारी सीबीआय आणि विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केला. तपासात फारशी प्रगती झाली नसल्याची बाब या अहवालातून स्पष्ट होताच नाराज झालेल्या न्यायालयाने तपास यंत्रणांना चांगलेच फटकारले. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

 

गेल्या पाच वर्षांपासून तपास यंत्रणा फक्त अहवालावर अहवाल सादर करत आहेत. या प्रकरणातील आरोपी मात्र मोकाटच आहेत. तपास यंत्रणा अजूनही जुन्याच पद्धतीने काम करत असून तपासाची पद्धत आता गुन्हेगारांनाही चांगलीच अवगत झाली असल्याबाबतच्या मताचा न्यायालयाने पुनरुच्चार केला. दशकभरापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना जेव्हा आपल्या जिवाचे बरेबाईट होईल, याबद्दल भीती वाटू लागते तेव्हा ते शरण येतात. तसे या प्रकरणात होऊ देऊ नका, असा इशाराही न्यायालयाने या वेळी दिला. 

 

परदेशी नागरिकांत वाईट संदेश  
दररोज आम्ही बलात्कार आणि हत्यांच्या बातम्या वाचतो. या बातम्यांमुळे परदेशी व्यक्तींना आपल्या देशात सुरक्षित वातावरण नसल्याचे वाटते. तपास यंत्रणांच्या उदासीनतेमुळे खुल्या विचारांचे लोक या देशात सुरक्षित नाहीत, असा समज परदेशी समुदायामध्ये निर्माण होत आहे. हे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी घातक असून तपासाच्या पद्धती बदलण्याचा सल्ला न्यायालयाने तपास यंत्रणांना दिला.  

बातम्या आणखी आहेत...