आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटीविना परतले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकास निधीसंदर्भात बुधवारी भेट घेणार होते. परंतु सभागृहाचे काम सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांना वेळ काढता न आल्याने मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. मात्र दोघांनी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  


बुधवारी विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने  मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार होते. त्यामुळे ठाकरेंसाेबत त्यांच्या बैठकीची वेळ सहा वाजता ठरवण्यात आली. उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून उद्धव ठाकरे ‘शिवालया’त आल्याचे सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेत उत्तराला वेळ लागल्याने भेटीची वेळ सात करण्यात आली. परंतु मुख्यमंत्र्यांचे उत्तर न संपल्याने त्यांच्या प्रतीक्षेत तिष्ठत बसलेल्या उद्धव ठाकरे यांना भेट न घेता  मातोश्रीवर परतावे लागले. दरम्यान, सभागृहातील कामकाज संपल्यानंतर  मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि नियोजित बैठक रद्द झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. लवकरच पुढील बैठक घेऊ, असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.