आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांऐवजी विलासरावांचे छायाचित्र, \'महाराष्ट्र अहेड\'चे वितरण थांबविले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र शासनाच्या 'लोकराज्य' मासिकाची इंग्रजी आवृत्ती 'महाराष्ट्र अहेड'च्या एप्रिल 2018 च्या अंकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तरुणपणाचे छायाचित्र म्हणून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे छायाचित्र प्रकाशित झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या अंकाचे वितरण तातडीने थांबविण्यात आले असून यासाठी जबाबदार असलेल्या संस्थेवर कारवाई करण्यात येणार असल्याचा खुलासा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केला आहे.

 

लोकराज्य मराठी मासिकाची निर्मिती प्रक्रिया संपल्यानंतर त्या अंकातील आशयाच्या अनुषंगाने 'महाराष्ट्र अहेड' या मासिकाची निर्मिती खासगी संस्थेकडून करुन घेण्यात येते. या अंकातील सर्व छायाचित्रे अधिकृतच असावीत, अशा स्पष्ट सूचना या संस्थेला देण्यात आल्या आहेत. या संस्थेने एप्रिल 2018 चा अंक मुद्रणाला पाठविण्याच्या आधी महासंचालनालयाला सादर केलेल्या मसुद्यामध्ये वर नमूद छायाचित्र अधिकृत संकेतस्थळावरुन घेण्यात आल्याचे सांगितले. मात्र अंक प्रकाशित झाल्यानंतर संबंधित छायाचित्र हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नसून दिवंगत विलासराव देशमुख यांचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या अंकाचे वितरण थांबविण्यात आले. संबंधित संस्थेने आपली चूक झाल्याचे मान्य केले असून या संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात आहे.

 

कोणत्या मासिकात झाली चूक?
- महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य या मासिकाची इंग्रजी आवृत्ती 'महाराष्ट्र अहेड'मध्ये ही गंभीर चूक झाली आहे.
- 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी झाली. यानिमित्ताने शासनाने जयंती विशेषांक प्रकाशित केला होता. त्याच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये ही मोठी चूक झाली आहे.
- डॉ.आंबेडकरांचे अनुयायी आणि अभ्यासकांनी शासनाच्या या चुकीबद्दल रोष व्यक्त केला आहे. महामानवासंबंधी विशेषांक छापत असताना अभ्यासक आणि तज्ज्ञांची मदत घेण्याची तसदी शासनाने का घेतली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या योजना आणि कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनतेसोबत शासनाचे जनसंपर्काचे माध्यम म्हणून लोकराज्य मासिक ओळखले जाते. लोकराज्य मासिक आता मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दु आणि गुजराती भाषेत प्रकाशित होते.

- शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचणारे हे मासिक मानले जाते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी याचे आवर्जून वाचन करतात.
- अनेकवेळा संदर्भासाठीही अभ्यासक या मासिकाचा उपयोग करतात. त्यामध्ये अशा प्रकारची चूक ही गंभीर बाब मानली जात आहे.

 

आमच्याकडे विचारणा केली नाही- प्रा. अविनाश डोळस
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने आणि प्रकाशन मंडळाचे सचिव प्रा. अविनाश डोळस यांच्यांशी Divyamarathi.com ने संपर्क साधला. प्रा. डोळस म्हणाले, 'शासनाच्या प्रकाशनात अशा प्रकारची चूक होणे ही गंभीर बाब आहे. विशेषांक प्रकाशनापूर्वी लोकराज्यच्या संपादकांनी आमच्याशी संपर्क केलेला नव्हता.'

बातम्या आणखी आहेत...