आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालय मुख्य पोलिस कंट्रोल रूमशीही जोडणार; बसवणार 430 अत्याधुनिक CCTV कॅमेरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मंत्रालयात होत असलेल्या आत्महत्या आणि नाराज जनतेचा घेराव रोखण्यासाठी आता मंत्रालयात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही लावण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून पुढील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या यंत्रणेचे उद्््घाटन केले जाणार आहे. सेक्युटेक कंपनी हे ४३२ कॅमेरे लावत असून पुढील देखरेखही हीच कंपनी करणार आहे. या योजनेसाठी १२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.  


नोव्हेंबरमध्ये उस्मानाबादच्या ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने मंत्रालयाच्या अॅनेक्स इमारतीच्या सातव्या मजल्यावर चढून आत्महत्येची धमकी दिली होती. त्यानंतर वयोवृद्ध धर्मा पाटील यांनी विष पिऊन आत्महत्या केल्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा आणि सीसीटीव्हीचा मुद्दा चर्चेत आला होता. फेब्रुवारी महिन्यातच मंत्रालयात ४३२ सीसीटीव्ही लावण्यास मंजुरी देण्यात आली होती. यासाठी प्राईस वॉटर कूपर हाऊस या संस्थेला अहवाल देण्यास सांगण्यात आले होेते. कंपनीचा अहवाल आल्यानंतर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे पुरवणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात सेक्युटेक कंपनीची निविदा मंजूर करण्यात आल्याची माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली.  


खरे तर मंत्रालयाचे नूतनीकरण केल्यानंतर सीसीटीव्ही लावण्यात आले होते. प्रत्येक मजल्यावर साधारणतः चार ते पाच कॅमेरे होते, परंतु हे सीसीटीव्ही कॅमेरे फक्त नावालाच होते. त्याचे मॉनिटरिंग केले जात नव्हते. धर्मा पाटील यांच्या हत्येनंतर हर्षल रावते या तरुणानेही मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. मात्र त्याची उडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली किंवा नाही याबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते.

 

त्यानंतर मार्चमध्ये मुख्यमंत्री कार्यालयासमोर एका शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते, परंतु सीसीटीव्ही नसल्याने याची सत्यता पाहता आली नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्युटेक कंपनी संपूर्ण मंत्रालयात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असून हे कॅमेरे झूम, पॅन करता येणार आहेत. तसेच फेस रिकगनिशन टेक्निकचाही वापर केला जाणार असून यासाठी मंत्रालयाच्या तळमजल्यावरील पोलिस विभागात एक कंट्रोल रूम स्थापन करण्यात येत असून त्याचे काम सुरु झालेले आहे.  

 

मंत्रालयात रोज ३ हजारांहून अधिक नागरिक येतात  
स्थानिक पातळीवर आपली कामे होत नसल्याने मंत्रालयात दररोज साधारणतः ३ हजार नागरिक येतात तर मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी हा आकडा पाच ते सहा हजारांपर्यंत जातो. या सगळ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

 

२४ तास निगराणी, अद्ययावत कंट्रोल रूम  
मंत्रालयातील कंट्रोल रूमसोबतच मुंबईत लावलेल्या कॅमेऱ्यांसाठी विशेषत्वाने तयार केलेल्या पोलिसांच्या कंट्रोल रूमशीही हे कॅमेरे जोडले जाणार आहेत. या कंट्रोल रूममध्ये संपूर्ण मंत्रालयाचे २४ तास लाइव्ह मॉनिटरिंग केले जाणार आहे. या कॅमेऱ्यांमुळे आता संपूर्ण मंत्रालय सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गांनी येऊन धरणे धरणाऱ्यांची माहितीही त्वरित उपलब्ध होणार असून एखादी व्यक्ती संशयास्पदरीत्या वागत असल्यास त्याची माहिती पोलिसांनी देऊन त्वरित कारवाई करणे शक्य होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

 

 पुढील स्लाईडवर पहा, आणखी फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...