आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहनमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ST कर्मचाऱ्यांचा संप मागे; बहुंताश मागण्या झाल्या मान्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वेतनवाढीच्या घोषणेनंतर नाराज एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून अचानक पुकारलेला संप अखेर शनिवारी रात्री मागे घेण्यात आला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. चर्चा सकारात्मक होऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुंताश मागण्या मान्य झाल्याने रात्री उशिरा संप मागे घेत असल्याची घोषणा कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. 


दिवाकर रावते व कर्मचारी संघटनांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. या वेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राईब संघटनेचे श्री. निरभवणे, इंटकचे श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते. तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओलही उपस्थित होते.


महामंडळाने शेकडो संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. बीड जिल्ह्यातच १२१  जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले तर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण ९ आगारातील ४६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. संप काळात शिवशाहीसह अनेक एसटी गाड्यांचेही नुकसान करण्यात आले. एसटीचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दाही निकालात निघाला आहे.

 

वेतनवाढीनंतर गैरसमजातून नाराजी 

दिवाकर रावते यांनी सांगितले, महामंडळाने ४८४९ कोटींची पगारवाढ केली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार असूनही त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले होते. त्यांनी गैरसमज दूर करावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची संघटनांकडून करार करून अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार ते ज्या काळापासून नोकरीत आहेत त्या काळापासून देण्यात येईल. तसेच संपादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांबाबत कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

बसचालकाच्या मृत्यूनंतर हिंगोलीत सर्व फेऱ्या बंद

येथे बसचालकाचा शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. कामाचा ताण आणि संप चालू असतानाही या चालकाला ड्यूटीवर जाण्यास आगार व्यवस्थापनाने दबाव आणल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत आगारातील कामगार संघटनांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे हिंगोली आगारातून ४५ ते ४८ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.   रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील रहिवासी भास्कर अवचार हे हिंगोली येथील आगारात चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी गेले तीन दिवस हिंगोली ते रिसोड अशी ड्यूटी घेतली होती. शनिवारी सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागले. यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

 

दबाव आणला नाही; चालकानेच स्वत: ड्यूटी मागून घेतली...

भास्कर अवचार यांनी आजची हिंगोली ते रिसोड ही ड्यूटी मागून घेतली होती.  त्यांच्या विनंतीनुसार त्यांना शनिवारी हिंगोली ते रिसोड या फेरीसाठी पाठवण्यात येणार होते. परंतु त्यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचा मृत्यू झाला. आगार व्यवस्थापनाने त्यांच्यावर कोणताही दबाव आणला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू आणि आजचा संप, प्रशासनाचा दबाव याचा तिळमात्र संबंध नाही. 

- एस. एन. पुंडगे, आगारप्रमुख, हिंगोली.

 

 

बातम्या आणखी आहेत...