आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या पराभवासाठी समविचारी पक्षांची महाआघाडी गरजेची- अशोक चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असेल तर एकास एक उमेदवार दिला पाहिजे आणि यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणून महाआघाडी करण्याची आवश्यकता असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केले. मुंबईत गांधीभवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

या बैठकीत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील दिशेसंदर्भात चर्चा करण्यात आली. जवळपास पाच तास चाललेल्या बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. तसेच महाआघाडीबाबतही चर्चा करण्यात आली. अशोक चव्हाण म्हणाले, धर्मांध आणि जातीयवादी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष व समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे.

 

कर्नाटकप्रमाणे समविचारी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल. सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणून भाजपविरोधात महाआघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्ष पुढाकार घेईल. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपविरोधी ७० टक्के मते आणि कर्नाटकमध्ये निवडणुकीनंतर झालेली समीकरणे याचा विचार करता महाराष्ट्रात येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्यासाठी काँग्रेसने पहिले पाऊल टाकले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १२ जून रोजी मुंबईत येणार आहेत. या बैठकीचा अहवाल त्यांना सादर करून यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही चव्हाण म्हणाले.   महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसप, बहुजन विकास आघाडी, सीपीएम, रिपाइं (प्रकाश आंबेडकर) या समविचारी पक्षांबरोबर आघाडी होण्यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचेही चव्हाण म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...