आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यसेवनात मराठवाडा मागे, मात्र महसूल मिळवून देण्यात अव्वल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मद्य विक्रीत मराठवाडा इतर विभागांच्या तुलनेत बराच मागे आहे. मात्र, विकासातील प्रादेशिक असमतोलामुळे आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या याच मराठवाड्याने मद्य उत्पादन व विक्रीच्या मार्गे राज्य सरकारला यंदा तब्बल २ हजार ५६० कोटींचा विक्रमी महसूल प्राप्त करून देत इतर महसुली विभागांच्या तुलनेत बाजी मारली आहे. याउलट मद्यसेवनात हा विभाग बराच मागे आहे.  एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत मराठवाडा विभागात उत्पादन शुल्क विभागाने २ हजार ५६० कोटी, पुणे विभागाने १ हजार ७४४ कोटी, ठाणे विभागाने १ हजार २११ कोटी महसूल जमा केला आहे. नागपूर विभागात सर्वात कमी म्हणजे ४५३ कोटी मिळाला आहे.  


मद्य उत्पादन, विक्री आणि परवाने इत्यादी मार्गाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे महसूल जमा होतो. मागच्या वर्षी राज्य सरकारच्या तिजोरीत या विभागाने १२ हजार २८७ कोटींची भर घातली होती. यंदा नोव्हेंबरपर्यंत ७ हजार ८३३ कोटी जमा केले आहेत. त्यात एकट्या मराठवाड्याने २ हजार ५६० कोटी देऊन सर्वात मोठा वाटा उचलला आहे.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठवाडा विभाग मद्यसेवनात मात्र बराच मागे आहे. यंदा मराठवाड्यात ३ कोटी ६२ लाख लिटर देशी, तर ९६ लाख लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे हे विभाग मद्य विक्रीत मराठवाड्याच्या कितीतरी पुढे आहेत. दुष्काळी मराठवाड्यात बिअर्सचे मोठे उत्पादन होत आहे. त्यासाठी होत असलेल्या पाण्याच्या नासाडीबद्दल आक्षेपही घेतले गेले आहेत. बिअर्स उत्पादन मराठवाड्यात अधिक होत असले तरी मराठवाड्यातील माणसांची बिअर्स तशी नावडती आहे. सरत्या वर्षात मराठवाड्यात १ कोटी ९ लाख लिटर्स बिअर्सची तर देशी मद्याची ३ कोटी ६२ लाख लिटर्सची विक्री झाली आहे. बिअर ही शहरी आणि मेट्रो भागात अधिक प्रिय आहे. मराठवाड्यात अधिकतर ग्रामीण भाग आहे. त्यामुळे इथे बिअर्सची विक्री राज्याच्या तुलनेत अल्प असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

 

मराठवाड्याचा मद्य आलेख
(एप्रिल ते नोव्हेंबर २०१७)
- देशी मद्य विक्री : ३.६२ कोटी लिटर्स
- विदेशी मद्य विक्री : ९६ लाख लिटर्स  
- बिअर्स विक्री : १.९ कोटी लिटर्स

बातम्या आणखी आहेत...