आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या अंतर्गत सत्तासंघर्ष?, 'स्थायी'तील दोन ज्येष्ठ नगरसेवकांना राजीनाम्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा देण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. - Divya Marathi
मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा देण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत.

मुंबई- मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा देण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर अशी त्यांची नावे असून, त्यांच्या जागी मनसेतून आलेल्या नगरसेवकांची वर्णी लागणार असल्याचे समजते. दरम्यान, सभागृहनेते यशवंत जाधव यांचे स्पर्धक असल्याने सातमकर व चेंबुरकरांचा पत्ता कापल्याचे समोर येत आहे. जाधव यांनी 'मातोश्री'वर यासाठी फिल्डिंग लावली व त्यात त्यांना यश आल्याचे मानले जात आहे. यशवंत जाधव याचा स्थायीच्या अध्यक्षपदावर डोळा असल्याची चर्चा आहे.

 

नगरसेवक आशिष चेंबुरकर हे वरळीसारख्या भागातून सलग चार वेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. तर, सायन-कोळीवाडा येथील नगरसेवक मंगेश सातमकर हे सुद्धा गेली अनेक वर्षे महापालिकेत निवडून येत आहेत. ज्येष्ठतेनुसार या दोघांची स्थायीच्या अध्यक्षपदावर वर्णी लागू शकते. मात्र, मनसेतून आलेल्या नगरसेवकांना स्थायीत संधी देण्याचा शब्द अनिल परब यांनी दिला होता. त्यानुसार दोघांना संधी देण्याचे घाटत आहे. त्यासाठी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी आपले संभाव्य स्पर्धक सातमकर व चेंबुरकर यांचा परब व 'मातोश्री'च्या मदतीने पत्ता कट केला. 

 

आपल्याला माहित असेलच की, मागील काही काळापासून मुंबई महापालिकेतील राजकारण अनिल परब पाहतात. त्यांनीच मनसेच्या सहा नगरसेवकांना एका रात्रीत शिवसेनेत आणले होते. त्यानुसार लांडे यांच्यासह आणखी एकाला स्थायीत संधी मिळू शकते. चार महिन्यांपूर्वी मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. दरम्यान, निष्ठावान शिवसैनिकांना डावलून दलबदलूंना सत्तेत स्थान मिळत असल्याने शिवसैनिकांत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून मनसेत गेलेल्या व परत सेनेत येत असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान मिळत असल्याने निष्ठवंत शिवसैनिकांत नाराजी आहे. काही दिवसापूर्वी यावरून मुंबईत चांगलीच पोस्टरबाजी झाली होती.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, शिवसेनेतील सत्तासंघर्षाचे कारण...

बातम्या आणखी आहेत...