आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसकेंना शंभर कोटींचे कर्ज देण्याची बुलडाणा बँकेची तयारी; रीतसर प्रस्तावाचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची विक्रीयोग्य १२ कोटींची मालमत्ता खरेदी करण्याची तयारी बुलडाणा बँकेने दाखवली अाहे. तसेच डीएसकेंना १०० कोटींपर्यंतचे कर्ज देण्यासही बँक तयार असल्याची माहिती डीएसकेंच्या वतीने साेमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. मात्र, तोंडी प्रस्तावाऐवजी बँकेच्या संचालक मंडळाने पारित केलेला रीतसर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद संपला असून येत्या २२ फेब्रुवारीला न्यायालय अंतिम फैसला सुनावणार आहे.   


गेल्या काही सुनावण्यांत कबूल केल्याप्रमाणे मंगळवारीही पन्नास कोटी रुपये जमा करण्यात डीएसके अपयशी ठरले. मात्र न्यायालयाने त्यावर आपले मत व्यक्त करण्यापूर्वीच डीएसकेंच्या वतीने बुलडाणा अर्बन बँकेचा प्रस्ताव न्यायालयासमोर ठेवण्यात आला. त्यावर तोंडी प्रस्तावाऐवजी त्याबाबतचे काही ठोस पुरावे सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या. त्यानुसार येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत बुलडाणा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने बैठक घेऊन त्यात डीएसकेंसोबतच्या आर्थिक व्यवहाराबाबतचा ठराव संमत करावा आणि त्या प्रस्तावाची प्रत पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि उच्च न्यायालयात २० फेब्रुवारीपर्यंत सादर करावी, असे निर्देश बँकेला देण्यात आले आहेत. 


गरजूंचे पैसे परत करा

स्वत:च्या गाडीत बसून तपासयंत्रणांपुढे जाणे सोपे आहे. मात्र गुंतवणूकदारांची काय अवस्था झालीय, हे दाखवण्यासाठीच त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले. ही बाब त्यांच्यासाठी अधिक अपमानकारक आहे, असे मत न्यायालयाने गुंतवणूकदारांना उद्देशून केले. डीएसके गुंतवणूकदारांचे २३२ कोटी रुपयांचे देणे लागतात. त्यामुळे बुलडाणा अर्बन बँकेने ठरल्याप्रमाणे रक्कम डीएसकेंच्या खात्यात जमा करताच सर्वात आधी सरकारने गरजू गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत.

बातम्या आणखी आहेत...