आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- जागतिक आर्थिक मंचाच्या ५० वर्षांच्या इतिहासात सर्व सहअध्यक्ष महिला असून असे प्रथमच हाेत अाहे. त्या जगातील सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच महिला अाहेत. त्यात भारताकडून माणदेशी फाउंडेशनच्या चेतना गाला-सिन्हा यांचादेखील समावेश अाहे. त्यांच्यासाेबत क्रिस्टीन लेगार्डे (अायएमएफ), नाॅर्वेच्या पंतप्रधान एरना साेलबर्ग, अायबीएमच्या प्रमुख जिनी राेमेटी यांच्यासारख्या महिला अाहेत. हे संमेलन दावाेसमध्ये २३ ते २६ जानेवारीदरम्यान हाेणार अाहे. चेतना गाला या प्राध्यापक हाेत्या; परंतु महिलांची स्थिती पाहून खूप दु:ख झाल्याने त्यांनी ही नाेकरी साेडून गरिबांसाठी फाउंडेशन सुरू केले. मुंबईत कच्छी गुजराती गाला कुटुंबात पाच भाऊ हाेते. त्यांचे संयुक्त कुटुंब हाेते. पाचही भाऊ नळ बाजारात किराणा दुकान चालवायचे. यापैकीच एक असलेले भाऊ मगनलाला गाला यांच्या चेतना या कन्या असून त्यांना चार बहिणी व दाेन भाऊ अाहेत.
‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना चेतना यांनी सांगितले की, अर्थशास्त्र हा माझा अावडीचा विषय हाेता. त्यामुळे मी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली. त्या काळात जयप्रकाश नारायण यांचे अांदाेलन सुरू हाेते. त्यामुळे अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असल्याने माझा कल या समाजवादी अांदाेलनाकडेही हाेता. त्यानंतर पुन्हा नाेकरी मिळाल्याने प्राध्यापक बनले. ही गाेष्ट १९८१ ची अाहे. मी व विजय सिन्हा दाेघेही जे.पीं.च्या अांदाेलनाशी जुळलेलाे हाेताे. अाम्ही दाेघे सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात नागरिकांची स्थिती पाहण्यास गेलाे. तेव्हाही ‘निश्चित राेजगार याेजना’ हाेती; परंतु राेजगाराच्या नावावर महिलांकडून दगड फाेडण्याचे काम करवून घेतले जात असे. ते पाहून हे काम तर अाजीवन कारावासाची शिक्षा भाेगणाऱ्या कैद्यांना दिले जाते, असा भाव माझ्या मनात अाला. पाेटासाठी काबाडकष्ट करणाऱ्या महिलांकडून हे काम का करवून घेतले जात अाहे? यासारख्या काही प्रश्नांनी मला घेरले. तथापि, समाजाचे कल्याण हाेईल व महिला अाणि पुरुषांसाठी याेग्य राहील असे काम कुणी देऊ शकणार नाही का? असे काही पर्यायदेखील माझे मन मला सुचवत हाेते.
याच काळात सातारा जिल्ह्यात अाणखी एक घटना घडली. रस्त्यावर फिरून चाकू, सुऱ्यांना धार लावण्याचे काम करणारी एक महिला बँकेत पैसे जमा करू इच्छित हाेती; परंतु कुणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हते. मला एक छाेटेसे दुकान सुरू करायचे असून, त्यासाठी मी बचत करत अाहे, अशी तिने अनेकदा विनंती केली; परंतु बँकेतील कर्मचाऱ्यांना पाझर फुटला नाही. ते दिवस उन्हाळ्याचे हाेते. मी विचारणा केल्यावर तिने सांगितले की, या भागात तापमान ४९ अंश सेल्सियसपर्यंत असते. इतक्या उष्णतेत मुलांना भाेवळ येते व ते बेशुद्ध पडतात. त्यामुळे मी त्यांना एका झाेपडीत सुरक्षित ठेवू इच्छिते. हे एेकून मी कळवळले. या घटनेने माझ्या मनात कायमचे घर केले. त्यामुळे १९८६ मध्ये विजय यांच्याशी लग्न केल्यानंतर मी माझी अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची नाेकरी साेडून लाेकांना मदत करण्याचा निश्चय केला. चेतना यांनी सांगितले की, मी सर्वप्रथम अशा महिलांच्या मदतीसाठी १९९६ मध्ये सहकारी बंॅक स्थापन करण्याचे ठरवले. मात्र, यात प्रमाेटर म्हणून सहभागी झालेल्या महिला सुशिक्षित नसल्याचे कारण सांगून मला रिझर्व्ह बंॅकेने परवाना देण्यास नकार दिला. त्यामुळे साताऱ्यातील दुष्काळग्रस्त भागात जाऊन त्या महिलांना शिक्षित करणे सुरू केले व पाच महिन्यांनंतर पुन्हा बंॅक परवान्यासाठी अर्ज दिला.
अाता दगड फाेडण्याचे काम करणाऱ्या महिलांची समस्या बाकी हाेती. त्यासाठी चेतना यांनी केलेल्या प्रयत्नांनी कालांतराने याच दुष्काळग्रस्त भागात धरणाचे काम मिळू लागले व पाहता-पाहता जाे भाग दुष्काळी हाेता ताे हिरवागार बनला. बचतीचे महत्त्व पटवून देत महिलांना लहान स्वरूपाचे कर्ज देण्याचे काम चेतना करतात. सध्या मानदेशी बंॅकेचे ९० हजार ग्राहक अाहेत व तीन लाख १० हजार महिलांना अातापर्यंत त्यांनी प्रशिक्षण दिले अाहे. त्यांचे पती अजूनही शेतीच करतात. चेतना या पूर्णपणे शाकाहारी अाहेत. विदेशात त्या सलाड व फळेच खातात. त्यांना तीन मुले असून, त्यात प्रभात हा सर्वात माेठा अाहे. ताे मानदेशीतच क्रीडा कार्यक्रम पाहताे. उर्वरित जुळ्या असलेल्या दाेघांपैकी करणने राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले असून, पार्थ हा लंडनमध्ये संगीतातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.