आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मंत्र्यांच्या वाहनांवर 52 लाख रुपयांचा खर्च; तोट्यातील कृषी महामंडळाने विखेंनाही दिला चालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तोट्यात असणाऱ्या महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना वाहन आणि चालक देत ७ महिन्यांत सुमारे ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. इतकेच नव्हे, तर विरोधी पक्षनेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही महामंडळानेच वाहनचालक दिला असून त्याला अद्यापही महामंडळ पगार देत आहे.    


शासकीय नियमाप्रमाणे मंत्र्यांना एक वाहन आणि चालक दिला जातो. मात्र, कृषिमंत्री फुंडकर यांना अतिरिक्त २, तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आणखी एक अतिरिक्त वाहन देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी चालकांची सोयही करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांनी दिली आहे. माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्र्यांचे खासगी सचिव आणि कृषी खात्याचे प्रधान सचिव यांनाही महामंडळाने वाहन आणि चालकाची सोय उपलब्ध करून दिली आहे.   

 
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्याकडे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कृषिमंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांसमवेत अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या वाहनांची माहिती मागितली होती. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना दोन वाहने आणि तीन वाहनचालक देण्यात आले असून हे तिन्ही वाहनचालक कंत्राटी पद्धतीने काम करीत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना एक वाहन आणि दोन वाहनचालक देण्यात आले आहेत. हे दोन्ही वाहनचालक कंत्राटी आहेत. कृषी खात्याचे प्रधान सचिव बिजयकुमार आणि कृषिमंत्र्यांचे खासगी सचिव धुरजड यांना प्रत्येकी एक वाहन देण्यात आले असून दिलेले वाहनचालक हे महामंडळाचे स्थायी कर्मचारी आहेत. माजी कृषिमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही महामंडळाने त्यांच्याकडे असलेला स्थायी कर्मचारी वाहनचालक म्हणून पुरवलेला आहे. दरम्यान, यावर आता सरकार काय स्पष्टीकरण देते हे पहावे लागेल.

 

वाहन देखभालीवर प्रत्येकी २५ लाखांपेक्षा जास्त खर्च 

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग फुंडकर यांना दिलेल्या दोन वाहनांच्या इंधन, सर्व्हिस आणि दुरुस्ती खर्चावर ७ महिन्यांत २५,२५,८०९ रुपये खर्च करण्यात आले आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासाठी नवीन वाहन विकत घेण्यात आले असून त्याची किंमत, इंधन, दुरुस्ती खर्चावर महामंडळाने ७ महिन्यांत २६,५०,२७८ रुपये खर्च केले आहेत. प्रधान सचिव बिजयकुमार यांना दिलेल्या वाहनावर इंधन आणि सर्व्हिस शुल्कापोटी ६६,०३५ रुपये खर्च करण्यात आले असून कृषिमंत्र्यांचे खासगी सचिव धुरजड यांच्या वाहनाच्या इंधनापोटी ४७,५३४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...