आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगपती प्रमोद गोएंकांचे आफ्रिकन देश मोझांबिकमधून अपहरण, मुंबईत तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रमोद गोएंका आपली पत्नी अवंती, मुलगा यश व मुलगी बीना समवेत.... - Divya Marathi
प्रमोद गोएंका आपली पत्नी अवंती, मुलगा यश व मुलगी बीना समवेत....

मुंबई- डीबी रिअॅल्टीचे मालक विनोद गोएंका यांचे बंधू प्रमोद गोएंका यांचे आफ्रिकन देश मोझांबिक येथून अपहरण करण्यात आले आहे. मोझांबिकची राजधानी मापुतो येथून खंडणीसाठी तेथील आफ्रिकन टोळीने प्रमोद गोएंका यांचे अपहरण केले. तेथीलच अज्ञात स्थळी गोएंकांना लपवून ठेवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विनोद गोएंका यांनी आपला भाऊ बेपत्ता झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली आहे. तसेच मुंबईत याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

 

प्रमोद गोएंका (वय 52) हे स्वत: उद्योगपती असून ते कामानिमित्त आफ्रिकन देश मोझांबिकला गेले होते. बंधू विनोद यांच्या डीबी रिअॅल्टीमधून बाहेर पडत प्रमोद यांनी दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला होता. शनिवारी ते मोझांबिकला एका हिरे व्यापा-याला भेटण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते गायब झाले आहेत.

 

प्रमोद गोएंका यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांचा मुलगा यश याने जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोएंका कुटुंबियांने दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद हे शनिवारी मोझांबिकममधील मापुतो शहरात कामानिमित्त पोहचले होते. शनिवारी सकाळी विमानाने ते मोझांबिकला रवाना झाले. त्यानंतर त्यांचे कंपनीतील सहका-यांशी शनिवारी सायंकाळी बोलणे झाले व त्यानंतर काही वेळानंतर त्यांचा फोन बंद झाला. मापुतोमध्ये ते कोठारी नावाच्या माणसाला भेटणार होते. कोठारी व प्रमोद हे तेथील एका स्थानिक हिरे व्यापा-याला भेटणार होते मात्र, आता या दोघांचाही ठावठिकाणा लागत नाही.

 

आफ्रिकन देशात श्रीमंत लोकांचे अपहरण करून खंडणी उकळण्याच्या टोळ्यांचा मागील काही वर्षात सुळसुळाट झाला आहे. एकट्या मोझांबिकमधून 2011 पासून आतापर्यंत 95 लोकांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. मापुतो, मातोला, बेईरा व नाम्पुला आदी शहरात या टोळ्या सक्रीय आहेत. श्रीमंत व बिजनेस लोकांवर नजर ठेवायची व खंडणीसाठी त्यांचे अपरहण करायचे. खंडणीच्या रूपातून भली मोठी रक्कम उकळायची व नंतर त्यांना सोडून द्यायचे असा उद्योग तेथे फोफावला आहे. दरम्यान, प्रमोद गोएंका यांच्या अपहरणानंतर खंडणी किंवा पैशांसाठी अद्याप कोणताही फोन आला नसल्याचे गोएंका कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...