आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड मंडळ गुंडाळून मुंडे साहेबांचा अवमान केला, धनंजय मुंडे यांचा सरकारवर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळाची केवळ घोषणा करून ते सुरु करण्यापूर्वीच गुंडाळणे हा लाखो ऊसतोड कामगारांचाच नव्हे, तर  मुंडे साहेबांचाही सरकारने अवमान केला आहे, असा संताप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.  


‘दिव्य मराठी’मध्ये सोमवारी यासंदर्भातले वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यासंदर्भात मुंडे म्हणाले, ‘मुंडे साहेब यांनी भाजपला राज्यात सत्ता मिळवून दिली. त्यांच्या प्रेमाखातर लाखो ऊसतोड कामगारांनी सातत्याने भाजपला साथ दिली. त्या सर्वांचा सरकारने मंडळ गुंडाळून विश्वासघात केला. स्व. मुंडेंच्या नावे परळीत ऊसतोड कामगार महामंडळ कार्यालय सुरू करण्यात येईल, अशी मुख्यमंत्र्यांनी पांगरी (परळी)  येथील मुंडे साहेबांच्या समाधिस्थळी जयंती कार्यक्रमात २०१४ मध्ये घोषणा केली होती. मात्र, ३ वर्षे उलटली तरी महामंडळ सुरू झाले नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

 

कामगारमंत्र्यांनी आश्वासन दिले होते  
आपण ऊसतोड कामगारांच्या मंडळासाठी सभागृहात वारंवार प्रश्न उपस्थित केल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला. ‘अधिवेशनातही यासंदर्भात मी सरकारला धारेवर धरले होते. त्यावर कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी महिन्याभरात मंडळ व कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्याची पूर्तता होण्यापूर्वीच हे मंडळ गुंडाळल्याचे उघड झाल्याने सरकारची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे, अशी टीका मुंडे यांनी केली.

 

बातम्या आणखी आहेत...