आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर एलिफंटा लेणी उजळणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद‌्घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वीज पाेहाेचविण्याचे लक्ष्य ठेवलेल्या सरकारला अातापर्यंत मुंबईपासून फक्त १० किमी अंतरावर असलेले पर्यटनस्थळ एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे वीज पुरवठा करण्यात यश अाले नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक सरकार या गावात वीज पोहोचवण्याचे आश्वासन देत होते परंतु ते पूर्ण करता आले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मात्र केवळ एका वर्षातच घारापुरी गावाला वीज पोहचवली असून ९५० गावकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याच महिन्यात या योजनेचे उद‌्घाटन केले जाणार आहे. 


घारापुरी लेणी असलेल्या या बेटाला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे. भारतातली सर्वाधिक प्राचीन लेणी असलेल्या या बेटाला लाखों देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. 


राज्य सरकारही एलिफंटा महोत्सव भरवून देशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. परंतु वीज नसल्याने पर्यटकांना संध्याकाळी माघारी परतावे लागत होते. शेतबंदर, मोरबंदर आणि राजबंदर या तीन गावांमध्ये साधारणतः ९५० लोकांची वस्ती आहे. उर्जा खात्याने वीज पोहचवून गावकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याची भावाना गावकऱ्यांनी व्यक्त केली.


महावितरणने समुद्राच्या खालून नेली केबल
महावितरण कंपनीने आपल्या न्हावाशेवा सबस्टेशनमधून फेब्रुवारी २०१७ मध्ये वीजपुरवठ्यासाठी प्रथमच समुद्राच्या तळाखालून विजेच्या केबल्स टाकण्याचे काम सुरु केले. हे काम आता पूर्ण झाले आहे. समुद्राखाली असणारा दाब व प्रतिकूल परिस्थिती यापासून केबलचे रक्षण करता यावे यादृष्टीने केबल टाकण्याकरता इंग्लंड व अमेरिकेतील तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची नुकतीच पाहणी देखील केली. या प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाली असून गावातील ५० ते ६० जणांनी विजेची मागणी नोंदवली आहे. त्यांना मीटरची जोडणी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी १८.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...