आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्याप कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा : सुभाष देशमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा ज्या अर्जदार शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, त्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी केले.    


कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती बँकेच्या शाखेत त्वरित सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करून त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणीअंती ही माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल आणि योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.  शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. 


काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती गठित केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करून दिलेल्या आहेत व बँकांनी त्यांच्या शाखेत त्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...