आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पुन्हा अग्नितांडव; बारा अनधिकृत रसायन गोदामे खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत रविवारी पुन्हा एकदा अागडाेंब उसळला. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास मानखुर्द परिसरातील मंडाले येथील भंगाराच्या व रसायनाच्या १२ अनधिकृत गोदामांना भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या आणि १० वॉटर टँकर यांच्या साहाय्याने मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळवले. दरम्यान, दुसऱ्या घटनेत साकीनाका येथील इंडिया हाॅटेलच्या पहिल्या मजला आगीत भस्मसात झाला. या दोन्ही आगींमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.   


कमला मिल दुर्घटनेनंतर पालिकेने हाॅटेल आणि बार यांच्या विरोधात अग्निशमनच्या अटींच्या अंमलबजावणीबाबत मोठी मोहीम उघडली होती. मात्र गोदामाला लागलेल्या रविवारच्या अग्नितांडवाने महापालिकेचे प्रयत्न तोकडे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबईतील बेकायदा गोदामांचा प्रश्न पुढे आला आहे. या गोदमांमध्ये प्लायवूड, कपड्याच्या चिंध्या, प्लास्टिक आणि ऑइल होते. सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग पसरत गेली आणि १० ते १२ गोदामे या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.  बेकायदा गोदाम मालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या वाॅर्ड अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या अाहेत, असे महापालिका प्रशासनाने 
सांगितले अाहे.


महापालिकेची डाेळेझाक, विखे पाटलांचा अाराेप
कमला मिल आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केल्याची वल्गना करणाऱ्या पालिकेस ही गोदामे दिसली नव्हती का ? का इथेही मांडवली करून डोळेझाक केली होती ? याचे उत्तर मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टि्वट करत दिली.  

बातम्या आणखी आहेत...