आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूर जिल्ह्यातील 4 आदिवासी विद्यार्थ्यांनी गाठले एव्हरेस्ट, \'मिशन शाैर्य\'चे यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी धाडसी कामगिरी करत जगातील तमाम गिर्यारोहकांना भुरळ घालणारे माउंट एव्हरेस्ट लिलया सर केले आहे. मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे या आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वोच्च शिखराला गवसणी घालण्याची ही देदीप्यमान कामगिरी केली आहे.


चंद्रपूरचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प, जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटक आणि धाडसीपणाला साद घालत ‘मिशन शौर्य’ची आखणी केली अाहे. या अभियानासाठी १० आदिवासी मुलांची निवड करण्यात आली. मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया आत्राम हे चंद्रपूर जिल्ह्यातील बोरडा, देवडा जिवती ब्लॉक्समधील आदिवासी मुले-मुली एप्रिल महिन्यात या मोहिमेवर निघाली होती. जुलै २०१७ पासून या विद्यार्थ्यांचे त्यासाठी प्रशिक्षण सुरू झाले होते. दार्जिलिंग, लेह, लडाख या ठिकाणी या मुलांना प्रशिक्षकांकडून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या महिन्यात ११ एप्रिल रोजी ते मुंबईवरून काठमांडूला रवाना झाले होते. मोहिमेवर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी या विद्यार्थ्यांना भेटून प्रेरणात्मक शुभेच्छा दिल्या होत्या.

 

जय्यत तयारी, आणखी दोघे करणार सर
या मोहिमेच्या या अंतिम टप्प्यासाठी या आदिवासी मुलांसोबत सहायक चमू, व्यवस्थापकांबरोबरच १५ शेर्पा, एक तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. बुधवारी एव्हरेस्ट सर करणाऱ्या चार जणांप्रमाणेच विकास सोयाम व इंदू कन्हाके हे दोघेही  लवकरच एव्हरेस्टची उंची गाठण्याची शक्यता आहे. त्यांची त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.

 

भविष्यातही वाटचाल शक्य
आदिवासी विभागातर्फे राबवण्यात आलेले हे पहिलेच धाडसी अभियान होते. माऊंट एव्हरेस्टचे शिखर सर करून या आदिवासी विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यातही आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आदिवासी विभागाकडून वेगवेगळे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. हे मिशन शौर्यशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचे यश आहे.   
- मनीषा वर्मा, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, सांगली : दहावर्षीय उर्वीने गाठले ‘सरपास’...

 

बातम्या आणखी आहेत...