आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारचे धोरण लवकरच मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात दुचाकी आणि चारचाकींमुळे वाढते प्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. यासाठी एक धोरण तयार करण्यात आले असून ते लवकरच मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. हे धोरण पुढील वर्षी लागू केले जाईल, अशी माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


मुख्यमंत्र्यांनी मे महिन्यात नागपूरात आयोजित कार्यक्रमात इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात धोरण ठरवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार धोरण तयार झाले असून त्यात आणखी काही मुद्दे समाविष्ट करून अंतिम रूप दिले जात आहे. महिनाभरात ते मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी सादर केले जाईल. या धोरणांतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेवरील चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. यामुळे पारंपरिक ऊर्जेची बचत होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीतही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवला जाणार आहे. ई-टॅक्सीसाठी बेरोजगारांना कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे. आगामी तीन ते पाच वर्षांत प्रत्येक वर्षी एक लाख इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याचा सरकारचा विचार आहे.   


वाहन उत्पादक कंपन्या आणि ग्राहकांसाठीही धोरणात सवलती देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहने अन्य वाहनांच्या तुलनेने महाग असतात. ते ही वाहने सर्वसामान्यांना परवडाव्यात आणि कंपन्यांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी कंपन्यांना जीएसटीत सवलत आणि ग्राहकांना वाहनाच्या किमतीत १५ टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचाही धोरणात विचार आहे. ग्राहकाने वाहन विकत घेतल्यानंतर ३ महिन्यांत त्याच्या खात्यावर १५ टक्के अनुदान जमा केले जाईल. मात्र, हे अनुदान फक्त सुरुवातीच्या काही लाख ग्राहकांनाच मिळणार आहे.   

 

सार्वजनिक वाहतुकीतही वापर  
राज्य सरकार मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि ठाणे येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणार असून आगामी तीन ते पाच वर्षांत एकूण वाहनांच्या पाच टक्के इलेक्ट्रिक वाहने आणण्याबाबतही धोरणात नमूद करण्यात आले आहे.  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच सरकारी कार्यालयांमध्ये असणारी वाहने टप्प्याटप्प्याने कमी करून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

बातम्या आणखी आहेत...