आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- नागपूरात रविवारी सकाळी एका सरकारी कर्मचा-याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्ती नागपूर महापालिकेत नोकरी आहे. मात्र, कोणत्या तरी कारणावरून त्याला नोकरीवरून काढल्याने हे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न करणारी व्यक्ती सुखरूप आहे.
याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'रामगिरी' येथे हा प्रकार घडला. सकाळी सात जण एका गाडीने सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर त्यातील एकाने अचानक आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. मात्र, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तत्काळ ताब्यात घेतलं व पुढील अनर्थ टळला.
संबंधित व्यक्ती नागपूर महापालिकेत मागील काही वर्षापासून कार्यरत आहे. मात्र, पालिकेतून अनुशासनात्मक कारवाईतंर्गत त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे. एकून सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या सातही जणांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. मात्र, त्यावर महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष करणे पसंत केले. आमची काहीही चूक नाही. आम्हाला नोकरीवर परत घ्यावे अन्यथा आत्मदहन करू अशा इशारा या सात जणांनी दिला होता. त्यानुसार आज सकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
रॉकेल अंगावर ओतून घेणा-या व्यक्तीसह उर्वरित सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर रामगिरी परिसरात सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
महापालिकेतील 106 कर्मचाऱ्यांना 2002 मध्ये नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यापैकी 89 कर्मचाऱ्यांना पुन्हा रूजू करून घेण्यात आले होते. उर्वरित 17 जणांना अद्याप रूजू करून न घेतल्याची त्यांची तक्रार होती. त्यामुळे यापैकी काही कर्मचा-यांनी कालच रामगिरीपुढे आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे रामगिरीपुढे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशोक देवगडे, मोहम्मद युसुफ मोहम्मद याकुब, सुरेश बर्डे, विनायक पेंडके, गणपत बारहाते आणि दीपक पोरकोडे या कर्मचाऱ््यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.