आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- क्षयरोग (टीबी) भयानक संसर्गजन्य रोग. अशा रुग्णांच्या सान्निध्यात आठ तास राहणे म्हणजे मृत्यूच्या छायेत वावरणे. मात्र हे माहिती असूनही केवळ सकारात्मक भावनेतून अशा रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्स-वार्डबॉयच्या सेवेचा मांडलेला हा वृत्तरूपी आलेख ‘नो निगेटिव्ह’चे उत्तम उदाहरण ठरावे....
क्षय (टीबी) मुंबईला चिकटलेला एक चिवट आजार. दिवसाला तीन व्यक्ती या अाजाराने प्राण सोडतात. टीबीच्या उपचारासाठी शिवडीत ‘समूह क्षयरोग’ (जीटीबी) रुग्णालय आहे. वर्षाला येथे ४० हजार रुग्णांवर उपचार होतात. पालिकेची शहरभर अनेक रुग्णालये आहेत. तीन वर्षांनी आरोग्य कर्मचाऱ्यास बदलीचा हक्क आहे, पण इथे मात्र बदलीने येण्यास कोणीच तयार नसतो. त्यामुळे इथल्या कार्मचाऱ्याची बदली होण्याची फारशी शक्यता नसते. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रजाही मिळत नाहीत. परिणामी आठवड्याचे ५६ तास प्रत्येक कर्मचारी टीबी रुग्णाच्या संपर्कात असतो. त्यांना दर्जेदार मास्क मिळत नाहीत.
दरवर्षी इथल्या १२ कर्मचाऱ्यास टीबीची लागण होते. त्यातल्या ५ जणांचा बळीही जातो. गेल्या अठरा वर्षांत २१८ कर्मचाऱ्यांना टीबीची बाधा झाली आहे. त्यात दाेन डाॅक्टरांसह ८६ कर्मचाऱ्यांचा मृत्यूही ओढवला. एमडीआर टीबी रुग्णाचा इथे स्वतंत्र ब्लाॅक आहे. या विभागात ५७ कंत्राटी कर्मचारी आहेत. दिवसाला त्यांना फक्त ५४० रुपये मजुरी मिळते. समजा त्यांना टीबीचा आजार झालाच तर माेफत उपचार अाणि दोन वर्षांची सुटी या पलीकडे पालिका काहीही देत नाही, असा आरोप मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे चिटणीस शैलेश कदम यांनी केला.
मृत्यूची छाया असलेल्या या रुग्णालयात तुम्ही कसे आणि का काम करता, असा प्रश्न एका वाॅर्डबाॅयला केला. त्यावर ‘बदली देत नाय... काय करणार?’ असे तो म्हणाला. ‘उपाशीपोटी नाय राह्यचं. वजन कमी होऊ द्यायचं नाही, मग काय होत नाही,’ असा त्याने त्याच्यापुरता मार्ग काढला आहे. मुलामुलींची लग्ने खोळंबलेली असल्याचे सांगत इथले कर्मचारी सातत्याने बदलीची मागणी करतात, असे मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डाॅ. पद्मजा केसकर सांगतात. टीबीचा जंतू आमच्यावर कधी हल्ला करेल सांगता येत नाही. सीमेवरच्या सैनिकांना भरपाई मिळते, आम्हाला काय? असे इथला सफाई कर्मचारी म्हणाला. इथे टीबीने मरण पावलेल्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची संख्या नजरेत भरणारी असते, असेही त्याने सांगितले.
कर्मचाऱ्याला टीबी झाला तर दोन वर्षे सुटी मिळते. पगार मात्र ११ महिनेच मिळतो. पगार बंद झाल्यावर खाणार काय? खायला नाय मिळाले की मग वाचेल तरी तो कसा? अशी हकिगत इथे १५ वर्षे कार्यरत असलेल्या नर्सने सांगितली. टीबी उपचारासाठी आजमितीस १३ अँटिबायोटिक्स आहेत. मात्र ‘मायकोबॅक्टोरियम ट्यूबरक्युलोसिस’ हा टीबी जंतू इतका सक्षम आहे की, त्याच्यावर एकाच वेळी पाच-सहा अॅँटिबायोटिक्सचा मारा करावा लागतो. शिवाय हा जंतू एका दिवसात मरत नाही. त्यासाठी किमान सहा महिने औषधे घ्यावी लागतात, असे जीटीबीचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजयकुमार नारिंग्रेकर म्हणाले.
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ समजून कर्तव्य
‘मायकोबॅक्टोरियम ट्यूबरक्युलोसिस’ जंतूच्या सान्निध्यात राेज आठ तास राहणे म्हणजे साक्षात मृत्यूच्या विळख्यात राहण्यासारखे आहे. अशा प्रकारे जोखमीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दोनच मागण्या आहेत. एक म्हणजे सहा तासांची ड्यूटी अाणि दुसरी म्हणजे दिवसाआड ‘एन ५ मास्क’ मिळावा. पण टीबी नियंत्रणासाठी वर्षाला शंभर कोटी खर्चणाऱ्या मुंबई महापालिकेने अद्याप मागण्यांची दखल घेतलेली नाही. मात्र, येथील कर्मचाऱ्यांचे ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ समजून काम सुरूच अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.