आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील डबेवाले ग्राहकांना देणार कुरियर, पार्सलसेवा: अॅपच्या माध्यमातून देणार \'स्‍मार्ट\' सर्व्हिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  मुंबईतील चाकरमान्यांना नियमित आणि वेळेवर घरचे भोजन पोहोचवणारे डबेवाले आता आणखी एक नवीन सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. डबेवाल्यांच्या टोपलीत यापुढे जेवणाच्या डब्यांसोबत कुरियर आणि पार्सलही दिसतील. लवकरच ही सेवा अस्तित्वात येणार असून या योजनेची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.

 

मुंबईतील काही भागांत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.  मुंबई शहरात सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त डबेवाले नियमितपणे सेवा देतात. डबेवाल्यांचे हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क मानले जाते. कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्यासाठी डबेवाले प्रामुख्याने लोकल रेल्वे आणि सायकलींचा वापर करतात.  


तळेकर यांनी सांगितल्याप्रमाणे, कुरियर आणि पार्सल सुविधा सुरू करण्यामागे डबेवाल्यांचे उत्पन्न वाढवणे हा हेतू आहे. डबे इच्छित ठिकाणी पोहोचवल्यानंतर मिळणाऱ्या सवडीच्या वेळेत डबेवाले हे काम करू शकतात. विविध कुरियर कंपन्यांच्या तुलनेत मुंबईत आम्ही खूप कमी वेळेत पार्सल पोहोचवू शकतो. काही लहानसहान मुद्द्यांवर आम्ही सदस्यांशी चर्चा करत आहोत. त्यानंतर या सुविधेच्या अाराखड्यास आगामी १५ दिवसांच्या आत अंतिम स्वरूप दिले जाईल.  
डबा आधी, नंतर कुरियर  कुरियर आणि पार्सल पोहोचवण्याची सेवा डबेवाले मुख्य कामानंतर देणार आहेत. डबा पोहोचवणे हे त्यांचे मुख्य काम आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे, असेही तळेकर यांनी सांगितले. 


मोबाइल अॅपने सेवा 

पारंपरिक सेवा देणारे डबेवाले हळूहळू तंत्रज्ञानाची कास धरत आहेत. डबेवाल्यांसाठी मोबाइल अॅप विकसित केले जाणार आहे. पार्सल सेवा देण्यासाठी डबेवाल्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...