आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन EVMचे पिशाच्च काढून टाका, उद्धव यांचे भाजपला आव्‍हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विरोधकांपाठोपाठ शिवसेनेनेही कर्नाटकमध्ये भाजपच्या यशावर संशयाचे बोट ठेवले आहे. भाजपने मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे. त्याने सर्व संशय दूर होऊन जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  २०१९ मध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असून त्यांनी प्रथमच ईव्हीएम मशीनकडे संशयाची सुई वळवली आहे.

 

ठाकरे म्हणाले, कुणी निवडणुकांचे अंदाज लावू नयेत, असे सध्या दिवस आहेत. कारण, अंदाज खोटा ठरू शकतो. जे जे जिंकले त्यांचे अभिनंदन, मग ते भाजप किंवा काँग्रेसही असेल. भाजपची घोडदौड निवडणुकांत दिसते, परंतु पोटनिवडणुकांत ते हरतात, त्यामुळे ईव्हीएमच्या गूढाची उकल अजून झालेली नाही.

 

ईव्हीएमवरील संशय पिशाच्च काढून टाकण्यासाठी निवडणुका बॅलेट पद्धतीने झाल्या पाहिजेत. भाजपला विश्वास असेल तर एकदाच फैसला होऊ दे म्हणजे विरोधकही शांत बसतील. ज्या राज्यांमध्ये भाजपची राजवट नव्हती तिकडे त्यांना यश मिळाले. मात्र, ज्या राज्यातील लोकांना भाजपच्या राजवटीचा अनुभव आहे त्यांचे मत वेगळे असू शकते. दरम्यान, पालघरात वनगा परिवाराची अवहेलना झाली. त्या परिवाराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही पालघर पोटनिवडणूक जिंकणारच, असा दावाही त्यांनी केला.   

 

कर्नाटकचे यश २०१९ ला मिळणाऱ्या यशाचे प्रतीक : मुख्यमंत्री   
कर्नाटकात भाजपला मिळालेले यश हे आगामी २०१९ च्या निवडणुकांत भाजपसह एनडीएला मिळणाऱ्या यशाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनात आशेची लाट निर्माण केली, या लाटेचे रूपांतर विश्वासाच्या लाटेत झाले आहे, त्याचाच हा परिणाम आहे. मोदींचा करिष्मा आणि अमित शहांचे धोरण यामुळेच भाजपला कर्नाटकात मोठे यश मिळाले आहे. मोदी लाट ओसरली, असे म्हणणाऱ्या विरोधकांना कर्नाटकच्या जनतेने उत्तर दिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

‘ईव्हीएम मशीनचा विजय असो’ : राज ठाकरे  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कर्नाटकात भाजपला मिळालेल्या विजयात ईव्हीएमचा वाटा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत “ईव्हीएम मशीनचा विजय असो,’ असे म्हटले आहे.  राष्ट्रवादीनेही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसची स्थिती चांगली होती. कर्नाटकातील नागरिक काँग्रेस, तेथील सरकारवर नकारात्मक बोलत नव्हते. त्यामुळे काँग्रेसचा विजय होईल, असे वाटत होते. बहुसंख्य ठिकाणी काँग्रेसला चांगला प्रतिसादही मिळत होता. भाजपला एकमार्गी विजय मिळणे हे मला पटत नाही. माझा विश्वास बसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजप निवडून येणे आणि कमी प्रमाणात काँग्रेस निवडून येणे हे प्राप्त प्रतिक्रियांशी सुसंगत नव्हते. वास्तविक लोकांच्या मनातील भावच प्रतिक्रियेत दिसत असतो. ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे ईव्हीएमचा निवडणूक आयोगाने आग्रह सोडून द्यावा आणि पुन्हा मतपत्रिकेचा वापर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...