आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससीत राज्यात सलग दुसऱ्या वर्षी उस्मानाबादचा टॉपर, यंदा महाराष्ट्राचा टक्का घसरला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यात सत्कार स्वीकारताना (उजवीकडे) डाॅ. गिरीश बदाेले. - Divya Marathi
पुण्यात सत्कार स्वीकारताना (उजवीकडे) डाॅ. गिरीश बदाेले.

औरंगाबाद  - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा (सिव्हिल सर्व्हिसेस) मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मेटपल्लीचा अनुदीप दुरीशेट्टीने या परीक्षेत देशात अव्वल येण्याचा बहुमान पटकावला. कसगी (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद ) येथील डॉ. गिरीश दिलीप बदाेले याने देशात २० वा, तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.  या परीक्षांत सलग दुसऱ्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेदवाराने महाराष्ट्रातून अव्वल राहण्याचा मान मिळवला आहे. एकूण ९९० उमेदवारांची निवड झाली असून यात महाराष्ट्रातील ८७ जणांचा समावेश आहे. 

 
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये मुख्य परीक्षा झाली, तर फेब्रुवारी-एप्रिलमध्ये मुलाखती झाल्या होत्या. अंतिम निकालात दिव्यांगांसह एकूण १०५८ उमेदवारांची निवड झाली आहे. यापैकी १८० जागा भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), ४२ जागा विदेश सेवा (आयएफएस), तर १५० जणांची पोलिस सेवेसाठी (आयपीएस) निवड झाली. केंद्रीय सेवा गट-अ साठी ५६५, तर गट - ब साठी १२१ उमेदवारांची निवड झाली आहे. 

 

‘यूपीएससी’साठी पहिल्या तीन प्रयत्नात अपयश; चाैथ्या प्रयत्नांत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा परिसरात कसगी गावचा रहिवासी डाॅ. गिरीश बदाेले याने केंद्रीय लाेकसेवा अायाेगाच्या परीक्षेत (यूपीएससी) देशात २० वी रँक मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. ‘ग्रामीण भागातील पायाभूत साेयी-सुविधांचा अभाव, घरची गरिबी, शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, अाई-वडिलांची मुलांना शिकवण्याची जिद्द, डाॅक्टर  झाल्यानंतर रुग्णालयात पाहिलेले गरीब रुग्णांचे हाल... हे चित्र बदलण्याची खूप इच्छा अाहे. त्यामुळेच अायएएस हाेण्याचा निर्णय घेतला हाेता. अाता या माध्यमातून ग्रामीण भागातील हालअपेष्टा कमी करण्यावर भर असेल,’ अशा भावना डाॅ. बदाेले याने ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केल्या.  


डाॅ. गिरीश म्हणाला, ‘माझे वडील दिलीप बदाेले हे शेतकरी, तर अार्इ गृहिणी अाहे. माझा भाऊ अाशिष इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत अाहे. दाेन्ही मुलांनी  शिकून माेठे व्हावे असे स्वप्न पालकांनी पाहिले अाणि अाज ते सत्यात उतरत अाहे. माझे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण तुळजापूर येथील सैनिक स्कूलमध्ये झाले. त्यानंतर लातूर येथील दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केल्यावर डाॅक्टर हाेण्याचे ठरवले. मुंबर्इतील जे. जे. हाॅस्पिटल येथून एमबीबीएस  उत्तीर्ण झालाे. घरची अार्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने शिक्षण घेत असतानाच नाेकरीही केली. डाॅक्टर झाल्यानंतर मुंबर्इतील एका रुग्णालयात रुजू झालाे.  रुग्णालयात येणाऱ्या गरिबांचे हाल पाहून मन हेलावून जात हाेते.’   


‘न्यूनगंड न ठेवता जिद्दीने अभ्यास करावा’ : ‘ग्रामीण भागातून अालाे असल्याने परिस्थितीची जाण मला हाेती. सन २०१४ पासून अायएएस परीक्षेची तयारी त्यादृष्टीने सुरू केली. दरराेजच्या अभ्यासाचे १० ते १२ तासांचे नियाेजन करून विविध पुस्तकांचे वाचन, लिखाण करण्यासाेबतच गटचर्चा मित्रांसाेबत सुरू केली. परीक्षेसाठी राज्यशास्त्र या विषयाची निवड मी केली हाेती. यूपीएस्सीच्या पहिल्या प्रयत्नात मुख्य परीक्षेपर्यंत गेलाे. दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा मुख्य परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत जाऊनही निवड झाली नाही. मात्र, अपयशाने न खचता चाैथ्यांदा पुन्हा परीक्षा दिली अाणि अंतिम यादीत २० व्या स्थानी निवड झाल्याने अानंद झाला अाहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मनात न्यूनगंड न ठेवता जिद्दीने अभ्यास करावा,’ असा सल्लाही डाॅ. गिरीश याने इतर उमेदवारांना दिला. 

 

पुण्याच्या पीयूष साळुंखेला ६३ वी रँक  
पुण्यातील पीयूष साळुंखे या विद्यार्थ्याने यूपीएस्सीच्या यादीत ६३ वी रँक मिळवलेे. पीयूष याने  सांगितले की, ‘माझे वडील वकील तर अाई गृहिणी. इंजिनिअरिंगपर्यंत माझे शिक्षण झाले. यूपीएसीत मी समाजशास्त्र विषय परीक्षा दिली. अायएएस हे देशसेवा करण्याचे माेठे व्यासपीठ असून यापुढील काळात जबाबदारीने मला नागरिकांची सेवा करता येणार अाहे.’

 

पुढील स्लाईडवर वाचा,... राज्यातील यशस्‍वी विद्यार्थ्यांविषयी अधिक माहिती...   

 

 

 

बातम्या आणखी आहेत...