आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजातील सर्व प्रश्नांची उत्तरे समाजाकडेच : सत्यजित भटकळ, वाचा संपुर्ण मुलाखत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लगान'सारखा वेगळ्या विचारांचा, पण मुख्य प्रवाहातील यशस्वी चित्रपट, ‘सत्यमेव जयते’सारखा सामाजिक संवेदना जागवणारा टीव्ही शो आणि आता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चार हजारांहून अधिक गावांमध्ये सुरू झालेल्या पाणी चळवळीवर आधारलेली "तुफान आलंया..’ ही मालिका. आमिर खान यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या वेगळ्या आणि लोकप्रिय प्रयोगांमागचं महत्त्वाचं नाव म्हणजे सत्यजित भटकळ. यशस्वी दिग्दर्शक, पाणी फाउंडेशनचे सीईओ ते या आगळ्यावेगळ्या पाणीदार चळवळीचे कार्यकर्ते या प्रवासाबद्दल भटकळ यांनी दीप्ती राऊत यांच्याशी साधलेला हा संवाद...

 

प्रश्न : चित्रपट ते सामाजिक चळवळ... अशा वळणाने तुमचा प्रवास नेमका कसा झाला? 
सत्यजित- माझ्यासाठी या दोन वेगळ्या वाटा नाहीत. हा माझ्या जीवनाचाच प्रवास आहे. माझ्यात सामाजिक जिव्हाळा अचानक उत्पन्न झालेला नाही. तो माझ्यासोबतच आहे. तो माझ्या प्रत्येक निर्मितीत येतो. “सत्यमेव जयते’च्या माध्यमातून आम्ही २४ प्रश्न मांडले तेव्हा लक्षात आलं, समाजातील प्रश्नांची उत्तरे समाजाकडेच आहेत. “सत्यमेव जयते’ हा फक्त त्यांचा आरसा होता. मुळात समाजात बदलाचे अंकुर असतातच. त्यांना फक्त पोषक वातावरणाची गरज आहे. जिथे हे पोषक वातावरण मिळते तिथे सामाजिक बदलाचे ते अंकुर जोमाने वाढतात. मूलत: माणसं ही चांगलीच असतात. किंबहुना समाजात प्रश्न निर्माण करणाऱ्या माणसांपेक्षा त्यावर उत्तरे शोधणाऱ्या माणसांची संख्या अधिक आहे. माणूस बदलला तर तो शिक्षण, आरोग्य, कचरा सर्वच समस्यांची उत्तरे स्वत:च शोधत असतो ही माझी धारणा आहे. प्रत्येक क्षेत्रात अशी उत्तरे शोधणारी माणसं आहेत. “सत्यमेव’च्या माध्यमातून आम्हाला त्यांना मांडण्याची फक्त एक संधी मिळाली. आता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आणखी एक मॉडेल आम्ही लोकांपुढे मांडत आहोत. यात माझी भूमिका कम्युनिकेटरचीच आहे. 


प्रश्न : मग, पाणी फाउंडेशनचा जन्म कसा झाला?     
सत्यजित- २०१२ मध्ये सत्यमेव जयतेच्या पहिल्या सीझनचा एक भाग पाण्याच्या प्रश्नावर होता. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विकेंद्रित जलव्यवस्थापन हे एकमेव उत्तर आहे. हा किडा तेव्हापासून माझ्या डोक्यात शिरला होता. महाराष्ट्रात विकेंद्रित जलव्यवस्थापनाच्या शास्त्राने पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मोठी परंपरा आहे. विलासराव साळुंखेंपासून अण्णा हजारे, पोपटराव पवार असे अनेक महत्त्वाचे प्रयोग झाले आहेत. मग फक्त हिवरेबाजार, राळेगण सिद्धी एवढ्याच गावांपुरते हे काम का सीमित राहिले आहे याचा आम्ही अभ्यास केला. खूप फिरलो. त्यातूनच “पाणी फाउंडेशन’चा जन्म झाला. ही अजिबात संस्था किंवा संघटना नाही. हे फक्त एक मॉडेल आहे. एकाही गावाला आम्ही एकही पैसा देत नाही आहोत. वॉटर कपमध्ये सहभागी गावांना फक्त विद्या आणि व्यासपीठ देत आहोत. 


प्रश्न : वॉटर कपच्या तिसऱ्या वर्षाला सुरुवात करताना लोकांचा प्रतिसाद कसा आहे?     
सत्यजित- प्रचंड आहे. पहिल्या वर्षी फक्त तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ही स्पर्धा यंदा महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांतील ४ हजार गावांपर्यंत पोहोचली आहे. याचे फक्त भौगोलिक क्षेत्रच वाढलेले नाही, तर लोकांचा उत्साहही प्रचंड वाढला आहे. यंदा ७ एप्रिलला यातील नोंदणीची मुदत संपली तेव्हा मध्यरात्रीच लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली होती. शेतीच्या अवजारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या, ढोल-ताशांच्या गजरात श्रमदानाला सुरुवात झाली आणि सकाळपर्यंत हजारो हातांनी श्रमदान केले हे अद््भुत आहे. हा श्रमदानाचा उत्सवच आहे एक प्रकारे...     


प्रश्न : महात्मा गांधी, विनोबा यांच्या काळानंतर “श्रमदान’ हा फक्त सरकारी योजनेच्या कागदावरचा एक शब्द राहिला होता...     
सत्यजित- खरंय. खरं तर आपल्या समाजाला श्रमदानाची मोठी परंपरा आहे. गांधी, विनोबा, अगदी बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार छावण्यांमध्ये श्रमदानाचा वारसा आपल्याला आहे. श्रमदान हे आपल्या देशाच्या नसानसात भरलेलं आहे. पण आपण या परंपरा विसरलो आणि सगळ्याचंच ‘सरकारीकरण’ केलं. सगळं कायद्यात बांधलं. पण कायद्याने सगळे प्रश्न सुटत नसतात, हे आपणच पाहिले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न लोकसहभागावर आधारलेल्या, श्रमदानाला प्रतिष्ठा देणाऱ्या विकेंद्रित जलव्यवस्थापनाच्या चळवळीतून सुटेल हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. आम्ही फक्त त्याचा पुनरुच्चार केला.   

 
प्रश्न : या प्रवासातील मोठी शिकवण कोणती?     
सत्यजित- सामान्य माणसाकडे केवढी अद्भुत शक्ती असते, ऊर्जा असते याची प्रचिती. आम्ही शहरी लोक समजतो, गावातील मंडळी अशिक्षित असतात, त्यांना शिकवण्याची गरज असते. पण पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने आम्ही पाहिले, ग्रामीण भागातील सामान्यातल्या सामान्य माणसांकडे प्रश्न सोडवण्याची प्रचंड ताकद आहे. त्यांचे कष्ट, त्यांची जिद्द, त्यांची हुशारी, त्यांचा साधेपणा, त्यांची तळमळ यातच सर्व प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे. त्यामुळे सामान्यांच्या सहभागातूनच सामाजिक प्रश्न सुटू शकतात, या प्रचंड मोठ्या ताकदीची जाणीव वॉटर कपने सिद्ध केली आहे. त्यात महिलांचे नेतृत्व आणि सहभाग विलक्षण आहे. आमच्या प्रशिक्षणाला गावातून येणाऱ्या पाच सदस्यांपैकी दोन महिला असतात. आपलं घरदार सोडून, जिने आपल्या गावाची वेसही ओलांडलेली नसते अशा महिला तीनशे-चारशे किलोमीटर प्रवास करून येतात, चार दिवस प्रशिक्षण घेतात आणि परत गेल्यावर तेवढ्याच उत्साहाने आणि चिकाटीने आपलं गाव पाणीदार करण्यासाठी झटतात, ते करून दाखवतात, हे विलक्षण आहे...     


प्रश्न : तीन वर्षांच्या या कामानंतर राज्यातील दुष्काळी परिस्थितीबद्दल काय वाटतं?     
सत्यजित- दुष्काळ हा निसर्गाने कमी आणि माणसाने जास्त निर्माण केलाय. अर्थात ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाच्या स्वरूपात बदल झाला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला, यंदा चांगला पाऊस होईल असे आपण म्हणतो, पण अनेक ठिकाणी पावसाचं भौगोलिक स्वरूप बदललेले दिसते. विदर्भात फक्त ३० टक्के पाऊस झाला, तर मराठवाडा आणि कोकणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पावसाची सरासरी फसवी बनली आहे. पूर्वी पावसाचे सरासरी दिवस ४५ होते. सध्या काही भागांत हे प्रमाण अवघ्या ९ दिवसांवर आले आहे. तेव्हा ९ दिवसांत त्यांनी त्या हंगामाचं पीक कसं घ्यायचं? पडणारा पाऊसही जातीपाती, गटतट, धर्मभेद याच्या फुटक्या बादलीतून गळून जात आहे. त्यामुळे हे सारं विसरून ज्या गावांनी एक होऊन गावातला पाऊस पायात साठवला तिथे त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला हे सिद्ध झाले आहे. शिवाय पाण्याचा हा प्रश्न फक्त नाले खोल करून, बंधारे बांधून संपणारा नाही. पाणी ही सामूहिक संपत्ती आहे, त्यामुळे समाजाने मिळून त्याची साठवण, नियोजन, वापर आणि पुनरुज्जीवन याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, हेच त्यावरचे उत्तर आहे. 


प्रश्न : पुढले नियोजन काय आहे?     
सत्यजित- याच भूमिकेतून याचा पुढला टप्पा म्हणून पाणीदार गावांमधील सामायिक पाणी वापराबाबतची आणखी एक स्पर्धा लवकरच सुरू करत आहोत. ही वर्षभरासाठीची स्पर्धा असेल. पाण्यासोबतच गावं, त्यांचं गवत, जंगल आणि माती या साऱ्याचे नियोजन कसे करतात आणि पाण्याचा सामुदायिक वापर कसा वाढवतात यावर ती स्पर्धा घेण्यात येईल. गावं तर हे सारं मोठ्या तळमळीने करत आहेत, पण शहरवासीयांचं काय? त्यांनाही याच्याशी जोडून घेणं खूप गरजेचं होतं. गेल्या वर्षी आम्ही महाराष्ट्रदिनी ‘चला गावी’ या कार्यक्रमाद्वारे शहरवासीयांना गावकऱ्यांसोबत श्रमदानासाठी जोडून दिले. गाव आणि शहर यांना भावनिकदृष्ट्या जोडणे हा त्याचा उद्देश होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी २५ हजार शहरवासी सहभागी झाले होते. यंदा आतापर्यंत नोंदणी करणाऱ्यांची संख्या १ लाखाच्या पुढे गेली आहे. २५ एप्रिलच्या मध्यरात्री ही नोंदणी बंद होणार आहे. आम्ही आवाहन करतो jalmitra.paanifoundation.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हीही तुमचे नाव नोंदवा आणि १ मेच्या श्रमदानासाठी ‘जलमित्र’ म्हणून सहभागी व्हा...     


प्रश्न : ‘सत्यमेव जयते’चा  प्रकल्प स्वतंत्र होता, पाणी फाउंडेशनचे काम शासनासोबत करत आहात. सरकारसोबतचा अनुभव कसा आहे?     
सत्यजित- तोदेखील अत्यंत सुंदर आहे. कारण यात कोणताही करार नाही, देणे-घेणे नाही किंवा कोणतीही औपचारिकता नाही. अामिरने (खान) एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या विकेंद्रित जलव्यवस्थापनाच्या कामाबद्दल सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्याला जलयुक्त शिवारचा ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याविषयी विचारले. तो म्हणाला, मला नुसतं ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचं नाही, तर प्रत्यक्ष काम करायचं आहे. मुख्यमंत्री म्हणतात, शेवटी दोघांच्या गाड्या एकाच दिशेने जाणाऱ्या आहेत. आमचे प्लॅटफॉर्म मात्र वेगवेगळे आहेत इतकेच. 

 

प्रश्न : ‘पाणीदार गावं’ हा शब्द पाणी फाउंडेशननेच पुढे आणला.

सत्यजित- अतुल कुलकर्णी! मी आधी ‘जलमय गावं’ असा शब्द वापरत होतो. अतुल म्हणाला, अरे पूर येतो तेव्हा ‘जलमय गावं’ म्हणतात, आपल्या गावाचं पाणी आपणच राखणाऱ्या गावांना  आपण ‘पाणीदार गावं’ म्हणू असं त्यानं सुचवलं आणि तेच नाव चपखल बसलं. 

बातम्या आणखी आहेत...