आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरे प्रकरण; तपास यंत्रणा गुन्हेगारांपेक्षा अधिक चतुर असणे गरजेचे : उच्च न्यायालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कॉ. पानसरे हत्या प्रकरणाशी संबंधित आणखी काही आरोपींची ओळख पटल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) उच्च न्यायालयात दिली. मात्र, अजून तरी आरोपींपैकी कुणालाही ताब्यात घेण्यात यश आले नसल्याचेही गुन्हे अन्वेषण विभागातर्फे सांगण्यात आले. काॅ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांची हत्या केलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणांना गुन्हेगारांपेक्षा अधिक चतुर असणे गरजेचे आहे, असे सांगत न्यायालय म्हणाले की, या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे, अन्यथा इतर गुन्हेगारांचा धीर वाढेल.   


याप्रकरणी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वतीने अॅड. अशोक मुंदरगी यांनी तपासाबाबतचा अहवाल बंद लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केला. तसेच या प्रकरणात गुंतलेल्या आणखी काही आरोपींची माहिती मिळाली असली तरीही त्यांचा माग काढण्यात तपास यंत्रणेला अद्याप यश आले नसल्याचेही ते म्हणाले. कारण यापैकी अनेकांनी आपले वास्तव्याचे ठिकाण, दूरध्वनी क्रमांक बदलले असून काही जण आपली ओळख बदलून राहत असल्याची माहितीही मुंदरगींनी दिली. याच मुद्द्याची री ओढत सीबीआयनेदेखील डॉ. दाभोलकर प्रकरणातील आरोपींनी आपले दूरध्वनी क्रमांक बदलून ओळख बदलल्याचा दावा न्यायालयासमोर केला. त्यामुळे आरोपींचा माग काढणे अवघड झाले असले तरीही सीबीआय आरोपींचा माग काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले. राज्य सरकार आणि सीबीआयने तपासाबाबतचा आपला संयुक्त अहवाल सादर करताना तपासासाठी आणखी पाच पथके तयार केल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच चौकशी करणाऱ्या पथकात सतत बदल होत असल्याने त्याचा तपासावर परिणाम होत असल्याची तक्रार केली. त्यावर आता या पथकांमध्ये कोणताही बदल केला 
जाणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने दिली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास लवकर लावावा, अशी मागणी  ‘पेन इंटरनॅशनल’ चे अध्यक्ष कार्ल्स टाॅरनेर  यांनी  गुरुवारी पुण्यात बोलताना केली.

 

याचिकाकर्त्यांची उद्विग्नता  
दोन्ही हत्या प्रकरणांची चौकशी एनआयएकडे देण्याची मागणी कुटुंबीयांच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात आली. दोन्ही कुटुंबीयांच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. अभय नेवगी यांनी या दोन्ही हत्या प्रकरणांमध्ये मारेकऱ्यांच्या तपासासाठी जे आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असते ते सीबीआय आणि राज्य सरकार दोघांकडेही नसल्याने तपास एनआयएकडे देण्यात यावा अशी मागणी केली. दोन्ही यंत्रणा आणि एनआयएचा काहीच समन्वय नसल्याने मारेकऱ्यांचा शोध लागत नाही. पानसरे हत्येला ३ वर्षे, तर दाभोलकर हत्येला साडेचार वर्षे झाल्यानंतरही मारेकरी मोकाट असल्याबद्दल याचिकाकर्त्यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

 

मागणी केल्यास निधी तरतूद करू 

त्यावर न्यायालयाने दोन्ही तपास यंत्रणांना तपासाकामी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला. तसेच तपासकामी निधीअभावी तंत्रज्ञानाची मदत घेण्यास किंवा तज्ज्ञांची मदत घेण्यास अजिबात कचरू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तुम्हाला कोणत्या बाबींची आवश्यकता असल्यास आम्हाला सांगा, आम्ही निधीची तरतूद होईल याची दक्षता घेऊ, असेही न्यायालयाने सांगितले. याशिवाय या तपासकामातील प्रगतीवर एखाद्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याचे नियमितपणे लक्ष आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली असता सीबीआयच्या संचालकांना तपासाबाबतची माहिती नियमितपणे दिली जात असून राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या संपर्कातदेखील असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.   

बातम्या आणखी आहेत...