आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालय इमारतीच्या सुरक्षेत माेठी वाढ; अात्महत्यांचे सत्र वाढल्याने सरकार दक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत गुरुवारी हर्षल रावते या पॅराेलवरील कैद्याने अात्महत्या केली हाेती. गेल्या पंधरा दिवसांत अात्महत्या व अात्महत्येच्या प्रयत्नांच्या चार- पाच घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा हादरून गेली अाहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.


मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर शुक्रवारी तीन अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले होते. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी दैनंदिन १५० पोलिस तैनात असतात. मात्र मंत्रालयात दररोज येत असलेल्या अभ्यांगतांची मोठी संख्या पाहता ही संख्या अपुरी पडते आहे. आत्महत्या होऊ नयेत यासाठी आता प्रत्येक मजल्यावर काही पाेलिसांना तैनात करण्यात आल्याने मंत्रालयाची सुरक्षा सांभाळणाऱ्या पाेलिसांवर अधिक ताण पडणार आहे.


मंत्रालयाच्या गच्चींना जाळी लावण्याची सूचना मंत्रालयाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली होती. तसेच १५० सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. मंत्रालयात आत्महत्याच्या वाढत्या घटनांमुळे सरकार उपाययोजनासाठी खासगी सुरक्षा एजन्सीची मदत घेण्याची शक्यता आहे. तसेच अभ्यागतांना द्यावयाच्या प्रवेश पाससंदर्भात नवी पद्धती आणण्याचा सरकारचा विचार आहे.

 

निवृत्त शिक्षकाचा अात्महत्येचा इशारा
न्यायालयाच्या आदेशानंतरही पेन्शन मिळत नाही, म्हणून शुक्रवारी गंगाधर पाटील या निवृत्त शिक्षकाने शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या दालनानासमोर ठिय्या आंदोलन केले. सरकारने न्याय दिला नाही तर आपण जिवाचे बरेवाईट करून घेऊ अशी धमकी या शिक्षकाने दिली. हा शिक्षक बीड जिल्ह्यातील लिंबागणेशच्या महाविद्यालयातून २०१५ मध्ये निवृत्त झाला आहे.  न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिला, परंतु शिक्षण विभाग न्याय देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...