आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारही गिरवणार हवामान बदलाचे धडे; 11 विभागांना करावा लागेल धोरणात बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तापमान वाढीमुळे गेल्या काही वर्षांत वाढलेल्या अतिपर्जन्यवृष्टी, पूर, वादळे, गारपीट, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारचे विविध विभाग आपल्या धोरणात अामूलाग्र बदल करण्याचे नियोजन करत आहेत. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीसंदर्भात शासकीय यंत्रणा सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, त्यात आता लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी आमदारांना हवामान बदलाचे धडे मिळावेत म्हणून राज्याच्या पर्यावरण विभागाने दोन आठवड्यांनी भरत असलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे.  


फडणवीस सरकारने नुकतेच हवामान बदलासंदर्भात धोरण मंजूर केले. आॅक्टोबरमध्ये या धोरणाचा अध्यादेशही काढण्यात आला. २०३० पर्यंत राज्याच्या कमाल तापमानात वाढ हाेईल, मात्र नीचांकी तापमानातही माेठी घसरण हाेण्याचा धाेका अाहे. तापमान बदल व आर्द्रता वाढीने पिकांची तग धरण्याची क्षमता कमी हाेण्याची भीती आहे, तसेच शेतीचे उत्पन्न घटून रोगराईची व्याप्तीही वाढण्याची शक्यता अाहे.  त्यासोबत ऊर्जेची मागणी वाढत जाणार आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी सरकारच्या ११ विभागांना संयुक्तपणे काम करावे लागणार असून त्यांना आपल्या धोरणातही बदल करावे लागणार आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टिकोनातून राज्यातील अतिसंवेदनशील जिल्ह्यांसाठी भौगोलिक परिस्थितीनुसार विशेष नियोजन करून जिल्हास्तरीय अनुकूल कृती आराखडे तयार करण्यात येणार आहेत. त्याची जबाबदारी सर्वस्वी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. मात्र त्यामध्ये लोकप्रतिनिधींचे सहकार्यही लागणार आहे. म्हणूनच आमदारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे पर्यावरण विभागाचे मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.    


प्रभू, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी म्हणजे ७ मार्च रोजी ही परिषद विधिमंडळाच्या सेंट्रल हाॅलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला राज्यातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

 

कार्यशाळेत काय?  
हवामान बदलाचे धोके, त्याला  तोंड देण्यासाठी अमलात आणावयाची धोरणे याची माहिती अामदारांना दिली जाईल.  हवामान बदलातील जाणकार तज्ज्ञांची व्याख्याने आहेत. परिषद रटाळ होऊ नये म्हणून माहितीपटही दाखवले जाणार आहेत. वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण चळवळीत लोकसहभाग वाढवण्यात यशस्वी ठरलेला अभिनेता अामिर खान याला परिषदेला बोलावण्याचेही नियोजन आहे. मात्र अद्याप अामिर यांच्याकडून होकार आलेला नाही, असे पर्यावरण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...