आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी, आंबेडकरांपेक्षा नरेंद्र मोदींच्या पुस्तकावर अधिक खर्च; शिक्षण विभागाचा अजब कारभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत राज्याच्या शिक्षण विभागाने पुस्तक खरेदीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि द्रष्टे समाजसुधारक महात्मा फुले यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्राला अधिक झुकते माप दिले आहे. गांधी यांच्या पुस्तकांसाठी ३ लाख, आंबेडकर यांच्या चरित्रांसाठी २४ लाख तर  मोदी यांच्या पुस्तकासाठी तब्बल ५९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सरकारी पुस्तक खरेदीतील दुजाभावामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे पुन्हा टीकेचे धनी झाले आहेत.   


इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुस्तक खरेदी केली जाते. त्यासंबंधीची ई-निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. या निविदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाच्या ३५ रुपयांप्रमाणे ७२ हजार ९३३ मराठी प्रती  घेण्यात आल्या आहेत. त्यासोबतच ३३ गुजराती, ४२५ हिंदी आणि ७ हजार १४८ इंग्रजी भाषेतील मोदी यांच्यावरील प्रतींचा समावेश आहे. ही सर्व पुस्तके डायमंड पॉकेट बुक्स यांच्याकडून घेण्यात आली आहेत. दि विलास बुक एजन्सीकडून नरेंद्र मोदी यांच्यावरील ६९ हजार ४१६ मराठी भाषेतील प्रतींची खरेदी करण्यात आली आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकावर एकूण ५९ लाख ४२ हजार इतकी रक्कम खर्ची पडली आहे.  


महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी विभागाने अवघे ३ लाख २५ हजार खर्च केले. त्यामध्ये सम्राट प्रकाशनाच्या २ हजार ६७५ प्रतींचा समावेश आहे. तसेच गुजराती निशिगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या गांधी चरित्राच्या ७ हजार २६० प्रती खरेदी करण्यात आल्या आहेत.  


गांधी यांच्याप्रमाणेच संविधानाचे कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक खरेदीवर अशीच अल्प रक्कम दिली आहे.  बाबासाहेबांच्या चरित्राच्या ७८ हजार ३३८ प्रती खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यावर २४ लाख २८ हजार रुपये खर्ची पडले आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी आणि बहुजनांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्यावरील पुस्तक खरेदीला अशीच अल्प रक्कम दिली आहे. 

 

पुस्तक खरेदी पारदर्शक : शिक्षणमंत्री तावडे  
पुस्तक खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे, असा दावा महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी केला आहे. ही पुस्तके तज्ञ समितीने निवडली होती, पुस्तक निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाल्याविषयी विविध प्रकाशक संघटनांनी समाधानही व्यक्त केल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...