आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी एकत्रच लढू- मुख्यमंत्री; भाजपने घेतलेला निर्णय एकतर्फीच- शिवसेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई मनपाच्या पाेटनिवडणुकीत भाजपने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला अाहे. या पार्श्वभूमीवर ‘शिवसेना आणि भाजप एकत्रच अाहेत. अाम्ही हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी एकत्रच आहोत आणि एकत्रच लढू’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र युतीचा निर्णय भाजपने एकतर्फी घेतलेला अाहे. अामचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच युती तोडलेली आहे, असे स्पष्ट केले.


अर्थसंकल्पावरील उत्तरातील भाषणात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना- भाजप एकत्र असून पुढील निवडणूक एकत्रच लढवतील, असे म्हटले होते. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनीही युतीचे संकेत दिले. शुक्रवारी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने  (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. एवढेच नव्हे, तर वायएसआर आणि टीडीपी केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे. शिवसेनेने मात्र या प्रस्तावाच्या वेळेस तटस्थ राहण्याची भूमिका घेतली अाहे. लाेकसभेत सरकारविराधाेत येणाऱ्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळेस शिवसेना सोबत राहील की विरोधात, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी सांगितले, ‘शिवसेना आणि भाजप एकत्रच आहेत आणि एकत्रच राहतील यात शंका नाही. राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी एकत्रच असून पुढेही एकत्रच लढू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘राष्ट्रवादी’ म्हणजे कोण, असे विचारत मुख्यमंत्री म्हणाले, ‘मला माहितीच होते तुम्ही हा प्रश्न विचाराल म्हणूनच मी राष्ट्रवादी हिंदुत्ववादी हे दोन शब्द एकत्रच उच्चारले. राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी एकत्रच आहेत आणि राहतील. याबाबत काहीही चिंता करू नका. ’


नायडू गेले त्यात नवीन नाही, शिवसेनेशी युती कायम : दानवे
‘एनडीएतून एकेक पक्ष बाहेर पडत आहेत. सेनाही विरोधात आहे. पक्षाला याचे किती नुकसान होईल?’  यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे  म्हणाले, ‘वाजपेयींच्या काळापासून ते मोदींपर्यंत आम्ही मित्रपक्षांच्या सोबतीने सत्तेत आहोत. प्रत्येक पक्ष स्वतंत्र असल्याने त्यांना त्यांचा स्वतःचा अजेंडा असतो. चंद्राबाबू नायडू आधी एनडीएत होते, नंतर गेले, नंतर परत आले आणि आता परत गेले, त्यामुळे त्यात नवीन नाही. शिवसेना आमचा २५ वर्षांपासून मित्र पक्ष आहे. एक निवडणूक वगळता आम्ही नेहमी एकत्रच लढलो. पुढेही एकत्रच लढू’, असे ते म्हणाले.

 

परतफेड म्हणून भाजपचा पाठिंबा 

मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे यांच्या या प्रतिक्रियेबाबत शिवसेनेच्या नेत्याला विचारले असता त्यांनी सांगितले, ‘आगामी निवडणुका युती एकत्र लढवेल, असे भाजपच म्हणत आहे. शिवसेनेच्या एकाही नेत्याने याबाबत सकारात्मक मत व्यक्त केलेले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे भाजप काय म्हणते याकडे आम्ही लक्ष देत नाही.’ मुंबईतील मनपाच्या पाेटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला अाहे त्याबाबत हा नेता म्हणाला, ‘भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या सुनेला आम्ही पाठिंबा दिला होता, त्याची परतफेड म्हणून भाजपने आता आम्हाला पाठिंबा दिला आहे.’

बातम्या आणखी आहेत...