आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनचेहऱ्याच्या रक्षकांचा नेहमी बाॅम्बशी नव्हे, मृत्यूशीच सामना; सकारात्मक विचारांमुळे ‘मिशन’ होते यशस्वी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सार्वजनिक ठिकाणी पडलेली प्रत्येक संशयास्पद वस्तू बॉम्बच आहे हे गृहीत धरून त्याला सामोरे जाणाऱ्या बिनचेहऱ्याच्या या रक्षकाचे आयुष्य म्हणजे दररोज मृत्यूशी सामनाच. मात्र अशा स्थितीत केवळ सकारात्मक विचारांच्या जोरावर ते वावरतात व सर्वकाही निर्विघ्न होईल यासाठी प्रयत्न करतात. ही सकारात्मकता अनेकांना प्रेरणादायी ठरेल म्हणून हा ‘नो निगेटिव्ह’ वृत्तांत....


‘प्रत्येक दहशतवादी संघटनेचे बॉम्ब बनवण्याचे स्वत:चे असे एक तंत्र असते. त्यामुळे फक्त बॉम्बची बनावट पाहून तो कुठल्या अतिरेकी संघटनेने प्लांट केला असावा याचा अंदाज ज्याला बांधता येतो तो खरा बॉम्ब टेक्निशियन..' आतापर्यंतच्या कारकीर्दीत किमान पंधरापेक्षा अधिक घातक बॉम्ब निकामी केलेले आशिष पाटील (नाव बदलले आहे) आपल्या जगावेगळ्या कामाचे स्वरूप समजावून सांगत होते. 


मुंबईसारख्या शहरात प्रतिदिन बॉम्ब सर्चिंगचे किमान दोन कॉल येतात. कॉल आल्यावर अवघ्या दोन मिनिटांत हे पथक घटनास्थळाकडे पोहोचते. दरम्यानच्या काळात स्थानिक पोलिसांशी संपर्क करत संशयास्पद वस्तूचा आकार आणि स्वरूप याबाबत माहिती घेतली जाते. परिसर निर्मनुष्य करून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला बोलावण्याच्या सूचना दिल्या जातात. 'कोणत्याही अतिरेकी संघटनेचा बॉम्ब ठेवण्यामागचा हेतू मनुष्यहानी घडवून आणणे हाच असतो. त्यामुळे संभाव्य मनुष्यहानी रोखणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असते,' पाटील सांगत होते. 


मनुष्यदेहाच्या ठिकऱ्या उडवणारे बॉम्ब तपासण्यासाठी काही विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला जातो. जसे की श्वानाच्या साहाय्याने अगोदर तपासणी केली जाते. आणखी एक प्रकार म्हणजे व्हिज्युअली सर्च, म्हणजे डोळ्यांनी पाहून बॉम्बचा अंदाज बांधणे, दुसरा प्रकार म्हणजे ऑडिअो सर्चिंग. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोपद्वारे बॉम्बच्या आतमधील आवाजावरून तपासणी केली जाते. याशिवाय मेटल डिटेक्टर, एक्स-रे डिटेक्टर किंवा एक्सप्लोझिव्ह डिटेक्टर याद्वारेही बॉम्ब असल्याची खात्री केली जाते. त्यानंतर सुरू होते बॉम्ब निकामी करण्याची कारवाई. एका पथकात कमांडरसह साधारण १२ जणांचा समावेश असतो. यामध्ये श्वान आणि त्याच्या डॉग हँडलरशिवाय आरएसपी वन आणि आरएसपी टू या दोघांचा समावेश असतो. बॉम्ब निकामी करण्याची जबाबदारी या दोघांवर असली तरीही एकावेळी एकच टेक्निशियन पुढे जातो. त्याला अडचण आल्यास आरएसपी टू मदतीला जातो. 


एवढे जोखमीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मात्र सरकारचे विशेष लक्ष नाही. २६/११ च्या हल्ल्यानंतर बॉम्बनाशक पथकासाठी नवी यंत्रसामग्री आणली गेली. यापैकी बरीच यंत्रे दहा वर्षांत निकामी झाली. वारंवार मागणी करूनही गृह विभाग त्याकडे दुर्लक्ष करत अाहे. समाजासाठी आपला जीव धोक्यात घालणारा हा रक्षक स्वत: मात्र मृत्यूच्या छायेतच वावरतो आहे. 


काेणताही बॉम्ब घातकच 
सर्वात अधिक घातक बॉम्ब कोणता? असे विचारले असता पाटील म्हणाले, 'तसा तर प्रत्येक बॉम्ब घातकच असतो. कोणताही बॉम्ब एकतर फ्युएल किंवा ऑक्सिडाइज्ड यापैकी एका वर्गवारीतील असतो. मग त्याचे काही उपप्रकार असतात. जसे - 'अँटी हँडलिंग' म्हणजे हात लावला की लगेच फुटणारा. दुसरा प्रकार म्हणजे रिमोटद्वारे ऑपरेट होणारा 'कमांड मेकॅनिझम'चा वापर असलेला बॉम्ब. तिसरा प्रकार असतो 'अॅम्बियंट', जो वातावरणाच्या बदलानुसार फुटू शकतो. चौथा प्रकार म्हणजे 'डिले मॅकेनिझन', ज्यामध्ये टाइम पेन्सिल वापरून बॉम्ब फुटण्याची वेळ वाढवलेली असते. 

 

...वाटते, ‘ही  शेवटची कारवाई’   
‘रिले सर्किट असलेला बॉम्ब सर्वात घातक असतो. कारण कुठलीही वायर कापली तरी बॉम्ब फुटणारच. त्यासाठी डिटोनेटर निकामी करण्याला आम्ही प्राधान्य देतो. जर बॉम्बमध्ये दोन डिटोनेटर वापरले असतील तर बॉम्ब निकामी करणे फारच अवघड होऊन बसते. साधारण शंभर ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची स्फोटके जर बॉम्बमध्ये वापरली असतील तर तो बॉम्ब प्राणघातकच असतो. त्यामुळे बॉम्बकडे जाताना कदाचित ही आपली शेवटची कारवाई ठरू शकते याची जाणीव ठेवूनच आम्ही पुढे सरसावतो,’ असे पाटील सांगतात.

बातम्या आणखी आहेत...