आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक निकषावरील आरक्षणाच्या विधानावर टीकेची झोड; आरक्षण रद्द करण्यासाठी पुढाकार घेणार का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आर्थिक निकषांवर आरक्षण बहाल करताना सध्या अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांना सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर बहाल केलेले आरक्षण रद्द करण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार काय, असा सवाल मराठा आरक्षणाचे समर्थक बाळासाहेब सराटे पाटील यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीत आर्थिक निकषावर आरक्षण असावे, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली होती. पवारांच्या या विधानावर मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण समर्थकांनी टीकेची झोड उठवली आहे.

राज्यात सध्या मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी प्रयत्नशील असलेल्या विविध संघटना तसेच समाज घटकांमध्ये शरद पवारांच्या आरक्षणाबाबतच्या विधानाने चांगलीच खळबळ माजली आहे.


... तर समाजाने कुणाकडे पहायचे?

आमदार नितेश राणेंनीही पवारांच्या मताशी असहमत असल्याचे स्पष्ट करत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज ज्या व्यक्तीकडे आशेने पाहतो आहे त्या व्यक्तीनेच जर असे विधान केले तर समाजाला दिशा कोणी द्यायची असा सवाल केला. आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचे झाल्यास घटनादुरुस्ती करावी लागेल आणि सद्यस्थितीत ते कितपत शक्य आहे, असा सवाल धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे यांनी केला आहे. तर अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचाचे अध्यक्ष मधू शिंदे यांनी पवारांच्या सुचनेशी असहमत असल्याचे सांगत पवारांना अपेक्षित बदल करायचे असतील तर डॉ. आंबेडकरांनी दिलेली घटना बदलावी लागेल,असे मत व्यक्त केले. एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनीही पवारांचे विधान म्हणजे २०१९ च्या निवडणुकांचा नवा मुद्दा असल्याचे सांगितले. पवार जर या विषयाबाबत गंभीर असतील तर, सत्तेत असताना त्यांनी यासाठी काय प्रयत्न केले, तेही स्पष्ट करावे, असे पठाण म्हणाले. महम्मद उर रहमान, रंगनाथन व सच्चन अशा समित्यांनी मुस्लीमांना सामाजिक आणि आर्थिक निकषांवर आरक्षणाची अगोदरच शिफारस केलेली असताना, त्याची अंमलबजावणी का केली जात नाही, याचेही उत्तर पवारांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

पवारांना आर्थिक निकषाचा मुद्दा आताच कसा सुचला : राणे
शरद पवारांना आर्थिक निकषाचा मुद्दा आताच अचानक कसा सुचला, असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन होत असताना त्यांनी आर्थिक निकषाचा उल्लेख कधीही केला नव्हता. पवारांच्या या मताशी असहमत असल्याचे राणेंनी सांगितले.

 

बाळासाहेबांची भूमिका समजण्यास ५० वर्षे का लागली : उद्धव ठाकरे 
जातीय आरक्षणाऐवजी आर्थिक निकषावर आधारित आरक्षण द्या, अशी बाळासाहेबांची ५० वर्षांपूर्वीची भूमिका होती. ‘प्रत्येक जातीत पोट असते, पण आता जातीवर पोट आणू नका,’ असे बाळासाहेब नेहमी सांगायचे. ही भूमिका समजायला पवारांना ५० वर्षे लागली, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

 

... तर हा प्रयत्न हाणून पाडू : रामदास आठवले
सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर सर्व ताकदीनिशी तो प्रयत्न हाणून पाडू, असे थेट आव्हान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिले. ते म्हणाले की, ‘या देशात  जोपर्यंत जाती आहेत तोपर्यंत जातीनिहाय आरक्षण कायम राहील. दलित, आदिवासी व ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आधी जातिव्यवस्था नष्ट करा.’

 

पवार संसदेत बोलले नाहीत: सराटे
आर्थिक निकषावर आरक्षणाचा पुरस्कार करण्यापूर्वी सध्याचे आरक्षण रद्द करणार का याचे उत्तर पवारांनी द्यावे. पवार आर्थिक आरक्षणाबाबत संसदेत बोलले नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षण हातातोंडाशी आलेले असताना समाजात गोंधळ माजवण्याचा हा प्रकार असल्याचे मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...