आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेला अडथळा नको म्हणून 50 हजार पावलांनी केली रात्रभर 15 किमी पायपीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी परीक्षार्थींना अापल्या माेर्चाचा त्रास हाेऊ नये, वाहतूक काेंडीत विद्यार्थी अडकू नयेत म्हणून लाँग मार्चमधील २५ हजार शेतकऱ्यांनी मुंबईतील चुनाभट्टी ते आझाद मैदान हे १५ किलाेमीटरचे अंतर रविवारी रातोरात पार केले. मोर्चे आणि संप यामुळे कायम त्रस्त असलेल्या मुंबईकरांना शेतकऱ्यांच्या या वर्तनाने अगदी सुखद धक्का दिला. मुंबईत आज शेतकऱ्यांच्या संयम, त्याग आणि कष्टाचे जिकडे तिकडे कौतुक केले जात होेते. 


साेमवारी सकाळी आपण विधिमंडळावर धडकणार, हा शेवटचाच तर पडाव आहे. या आनंदात चुन्नाभट्टीच्या सोमय्या मैदानावर रविवारी रात्री १६० किमी पायपीट करून थकले भागलेले शेतकरी विसावले होते. दहा वाजता रात्रीचे जेवण उरकले होते. आता पाठ टेकवायचेच बाकी होते. इतक्यात मोर्चाचे मुख्य नेते आमदार जे. पी. गावीत यांनी हाक दिली. ‘आपल्याला आता लगेच निघायचंय... उद्या दहावी-बारावीच्या परीक्षा आहेत. आपण सकाळी चालत निघालो तर शहरातील वाहतूक कोलमडेल. आणि हजारो विद्यार्थी परीक्षेला मुकतील....’ अाणि अांदाेलकांनीही त्याला उत्स्फूर्त साथ दिली. नाशिकच्या सीबीएससी चौकातून हा मोर्चा ६ मार्चला निघाला. सोमय्या मैदानावरचा मोर्चाचा पाचवा मुक्काम होता. मोर्चेकऱ्यांच्या पायांना सूज आलेली, तळव्यांना फोड आलेले. शनिवारच्या दिवसाची २० किमी पायपीट झालेली होती. आता पुन्हा विश्रांतीविना १५ किमी पायपीट करावी लगणार होती. सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन मैदानावर उपस्थित होते. त्यांनी बेस्टच्या १०० गाड्या आणि पोलिसांच्या ३५ व्हॅन आणायचे आदेशही दिलेले होते. ‘हवे तर आपण बसनी जाऊ’, असे आमदार गावीत मोर्चेकऱ्यांना म्हणाले. पण, १६० किमी चाललोय... शेवटच्या १६ किमी साठी बट्टा कशाला....असे मत काहींनी मांडले. आणि सुरू झाली रात्री १२ वाजताची पायपीट. आमदार गावीत यांनी हाक देताच पुढच्या दहा मिनिटांत सोमय्या मैदानावरचे २५ हजार शेतकरी आपला बोऱ्याबिस्तरा घेऊन मैदानाबाहेर आले होते.  हे सर्व पाहून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना गहिवरून आले. त्यांना घरी जाणे रास्त वाटेना. त्यांनीही मोर्चात चालण्यास सुरुवात केली. पहाटे साडेचार वाजेपर्यंत मंत्री महाजन जे. जे. फ्लायओव्हरपर्यंत पोहोचले. आता विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महाजन निश्चिंत झाले हाेते. पहाटे पाच वाजता ते आपल्या शासकीय निवासस्थानी परतले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अांदाेलक शेतकऱ्यांना माेबाइल चार्जिंगची सेवा...

बातम्या आणखी आहेत...