आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ललित’ बनण्यासाठी ललितावर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी; ललिता फिट असल्याने त्रास नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नाशिक - निसर्गाने अन्याय केलेल्या बीड जिल्ह्यातील महिला पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांना आधुनिक विज्ञानाने ज्ञान मिळवून दिले आहे. स्त्रीचे शरीर आणि पुरुषाची गुणसूत्रे अशा विचित्र परिस्थितीत जगत असलेल्या ललिता यांच्यावरील पहिली लिंगबदल शस्त्रक्रिया शुक्रवारी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात यशस्वी झाली.  


प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डाॅ. रजत   कपूर यांच्यासह अाठ जणांच्या टीमने सकाळी नऊ वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात केली.  तीन तासांच्या शस्त्रक्रियेत ललिता यांच्या शरीरातील अविकसित स्तन, अंडाशय आणि गर्भाशय काढून टाकण्यात आले. अाता त्यांची प्रकृती स्थिर अाहे. सहा महिन्यांच्या अवधीनंतर शरीरातील बदलांनुसार त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती डाॅ. कपूर यांनी दिली.  


डॉक्टरांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, लिंगबदल शस्त्रक्रिया शरीर सुन्न करूनच  करावी लागते. ललिताचे संपूर्ण शरीर इंजेक्शन देऊन सुन्न करण्यात आले हाेते. ‘ललिताची स्त्री- प्रजननक्षमता विकसित झाली नव्हती. शिवाय स्तनही विकसित नव्हते. पुरुष हार्मोन्स तिच्या शरीरात जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पहिल्यांदा ललिताचे ब्रेस्ट, अंडाशय आणि स्त्रीच्या शरीरात ज्या काही गोष्टी असतात त्या काढून टाकण्यात आल्या. ललिताला शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात अाले अाहे,’ असे डाॅ. कपूर म्हणाले.   
लवकरच प्रकृती स्थिर हाेईल


‘पुरुषाप्रमाणे लघवी करता यावी यासाठी एक ट्यूब टाकण्यात येईल. त्यानंतर पुढील शस्त्रक्रिया सहा महिन्यांनी केल्या जातील. ही शस्त्रक्रिया झाल्यावर दोन-तीन आठवड्यात तिला लघवी नीट करता येईल. त्यानंतर केसांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या इच्छेनुसार आकार दिला जाईल.’ ही शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयात दीड लाख रुपये खर्च येतो, पण सरकारी रुग्णालयात हा खर्च ४० ते ५० हजार आहे.

 

पण रुग्णालय प्रशासन कुटुंबाकडून एकही पैसा घेणार नाही. ललिताचे वय कमी असल्याने या शस्त्रक्रियेनंतर ती लवकरच स्थिर होईल. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकेल. या शस्त्रक्रियेमध्ये अनेकदा त्वचाविकार होण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढू शकतो. याकरिता काळजी घेण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेचा उद्देश ललिताचा आत्मविश्वास वाढवणे हा होता. आता तीन महिन्यांनंतर पुरुषांप्रमाणे शुक्राणू तयार होतात का हे पाहिले जाईल. त्यानंतर पुढील उपचार दिले जातील,’ असे डाॅ. कपूर यांनी सांगितले.  

 

ललिता फिट असल्याने काहीच त्रास झाला नाही  

 

सेंट जॉर्ज रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले की, ‘लिंगबदलाची या रुग्णालयातील  ही पहिली शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच लोकांनी रुग्णालयाशी संपर्क केलाय. ललिता लवकरच सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल. अनेकदा निसर्गाच्या विरोधात जाऊन एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा भीती असते. त्याचप्रमाणे अशा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने स्वतः काळजी घेतली पाहिजे.’ भूलतज्ज्ञ डॉ. संतोष गिते म्हणतात, ‘ललिता एकदम फिट होती. त्यामुळे जास्त काहीच त्रास झाला नाही. शस्त्रक्रिया अगदी सामान्य पद्धतीने करण्यात आली. ललिताच्या पूर्ण शरीराला अॅनेस्थेशिया देण्यात आला होता.’

बातम्या आणखी आहेत...