आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वीस वर्षांत देशात असमानता भीषण वाढली; ज्येष्ठ विचारवंत पी. साईनाथ यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशात गेल्या २० वर्षांत असमानता भीषण वाढली आहे. शेतकऱ्यांचे उग्र झालेले प्रश्न शेतकऱ्यांच्या संघटना सोडवतील, असा स्वार्थी पवित्रा घेऊन  देशातील बुद्धिवंतांसह स्वत:ला सुजाण म्हणवणारे लोकही विलक्षण उदासीन झाले आहेत. ही परिस्थिती देशासाठी चांगली नाही, असे मत पी. साईनाथ यांनी व्यक्त केले. 


सत्यशोधक मनोहर कदम यांच्या स्मृतिजागरानिमित्त माटुंगा येथील रुइया महाविद्यालयामध्ये गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी ‘विषमता, शेतीवरील अरिष्ट आणि माध्यमे’ या विषयावर पी. साईनाथ बोलत होते. कोल्हापूर येथील असंघटित कामगारांसाठी कार्यरत असलेल्या विद्या तावडे यांना सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सत्यशोधक चेतना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


 साईनाथ म्हणाले,  शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी चर्चा सुरू होताच सगळे त्यांच्या कर्जमाफीविषयी बोलायला लागतात. तो शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न कधीच नव्हता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सविस्तर चर्चा करण्यासाठी संसदेचे २० दिवसांचे कृषिविषयक विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सर्वच पक्षातील लोकांनी हलगर्जीपणा दाखवला आहे. महाराष्ट्रात शेतीविषयक प्रश्नांवर शरद पवार, विलासराव देशमुख यासारखे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्या नेत्यांनीही चुकीच्या भूमिका घेतल्या होत्या, असेही ते म्हणाले. 

 

आकड्यांच्या खेळातून सरकार सत्य लपवते  
गेल्या २० वर्षांत देशात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांबद्दल समाजातून फारशा प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. माणुसकी किती रसातळाला गेली आहे याचे हे उदाहरण आहे. शेतीतील उत्पन्न वाढलेले नाही, तर शेतीवर आधारित उद्योगांमधील उत्पन्न वाढलेले आहे. शेतीवर आधारित उत्पन्नही खालावलेले आहे. मात्र, यापैकी कोणतीच गोष्ट सरकार कबूल करत नाही. फक्त आकड्यांचा खेळ करून सत्य लपवले जाते, असेही पी. साईनाथ या वेळी म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...