आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख शेतकरी विधान भवनाला घालणार घेराव; नाशिक ते मुंबई निघणार लाँग मार्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकारचे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्याची घोषणा किसान सभेतर्फे करण्यात आली आहे. येत्या ६ मार्च रोजी म्हणजे अधिवेशनादरम्यानच नाशिक येथून निघालेला हा लाँगमार्च मुंबईत पोहोचताच विधानभवनाला बेमुदत घेराव घालण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी बुधवारी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.   


सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले असून कर्जाच्या वाढत्या बोजाने खचून जाऊन ते आत्महत्या करत आहेत. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याऐवजी सरकार मात्र फसव्या घोषणा करत असल्याचे सांगत सरकारच्या या फसवणुकीमुळे शेतकरी आणखी खचल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला. एवढेच नव्हे तर कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तब्बल १ हजार ७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहितीही त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर किसान सभेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा निकराचा लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०१६ मध्ये याच किसान सभेने नाशिक येथे एक लाख शेतकरी सत्याग्रह केला होता. नाशिक येथील सीबीएस चौकात राज्यभरातील एक लाख शेतकऱ्यांनी दोन दिवस केलेल्या या महामुक्काम सत्याग्रहाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आंदोलक यशस्वी झाले होते. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. जून २०१७ मध्येही शेतकरी संप पुकारत सरकारकडून शेतकऱ्यांशी संबंधित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळवले होते. मात्र, मागण्या पूर्ण करण्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूकच केली आहे. त्यामुळेच किसान सभेने पुन्हा एकदा नाशिकच्या त्याच सीबीएस चौकातून एक लाख शेतकऱ्यांसह विधानभवनावर चालत जाण्याचे नियोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...