आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनात कर्जमाफीबाबत आवाज उठवा; शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरेंचे अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी पक्षाच्या आमदार-खासदारांची बैठक घेऊन चर्चा केली. या चर्चेत शेतकऱ्यांची कर्जमाफी व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिवेशनात सरकारविरोधात आवाज उठवावा, असे निर्देश दिल्याचे समजते.   


या बैठकीस शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नेते उपस्थित होते. बैठकीस उपस्थित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशन सुरू असल्याने जनतेच्या प्रश्नांना कसा न्याय द्यायचा यावर बैठकीत चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना त्याबाबत मार्गदर्शन केले. अधिवेशनात पक्षाची छाप पडेल असे मुद्दे उपस्थित करावेत. शेतकऱ्यांचे न सुटलेले प्रश्न मांडावेत आणि शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसेल तर त्याबाबत आवाज उठवा, तसेच निवडणुकीत दिलेल्या आणि पूर्ण न झालेल्या आश्वासनांबाबत आवाज उठवा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली.   


बैठकीबाबत अामदार सुनील प्रभू यांनी सांगितले, विधिमंडळात अामदारांनी व संसद अधिवेशनात खासदारांनी काेणत्या प्रश्नांना वाचा फाेडावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी खासदार - अामदारांची संयुक्त बैठक घेण्यात अाली.  मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा, गारपिटीमुळे झालेले नुकसान, बोंडअळीमुळे झालेले नुकसान इत्यादी विषयांवर शिवसेना आमदारांनी विधिमंडळात आवाज उठवावा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा म्हणून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून दिल्लीच्या भाषा अकादमीला पत्र पाठवल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली. दरम्यान, शिवसेनेच्या पवित्र्यावर मित्रपक्ष भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...