आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी घोटाळा: नीरव मोदी व मेहुल चौकसीचा पासपोर्ट रद्द; 523 कोटींच्या 21 मालमत्ता जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ११,३९४ कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चौकसीचे पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाने रद्द केले आहेत. मंत्रालयाने १६ फेब्रुवारीला त्यांचे पासपोर्ट निलंबित करत आठवडाभरात उत्तर मागवले होते. सूत्रांच्या दाव्यानुसार कोणतेही उत्तर न मिळाल्याने शनिवारी त्यांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले. दुसरीकडे, ईडीने शनिवारी नीरवच्या आणखी ५२३ कोटी रुपयांच्या २१ मालमत्ता सील केल्या आहेत.  यात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधील १३५ एकर जमिनीचा समावेश आहे.  आजवर त्याची एकूण ६,३९३ कोटी रुपयांची मालमत्ता आणि ऐवज जप्त करण्यात आलेला अाहे. शनिवारी सील केलेल्या मालमत्तेत सहा रहिवासी कॉम्प्लेक्स, १० कार्यालय कॉम्प्लेक्स, पुण्यातील दोन फ्लॅट, एक सौर ऊर्जा प्रकल्प, अलीबागमधील फार्म हाऊसचा समावेश आहे. रहिवासी कॉम्प्लेक्समध्ये वरळीतील समुद्र महल अपार्टमेंटमधील एक पेंटहाऊस व एका फ्लॅटचाही समावेश आहे.  मनी लाँडरिंग कायद्यान्वये १४ फेब्रुवारीला दाखल गुन्ह्यानुसार कारवाई करत ईडीने नीरव माेदीच्या कंपन्यांतून मोठ्या प्रमाणात हिरे, रत्ने, सोने, दागिने, शेअर्स, बँकेतील ठेवी, महागड्या कार आणि घड्याळी जप्त केल्या आहेत. 


पीएनबी घोटाळ्याचा गौप्यस्फोट होण्यापूर्वीच परदेशात पळालेला नीरव मोदी, त्याची पत्नी एमी व मामा तथा गीतांजली समूहाचा प्रमुख मेहुल चौकसीला ईडीने २६ फेब्रुवारीला समन्स जारी केले आहेत. ईडीसह सीबीआय, प्राप्तिकर विभागासाेबत अनेक सरकारी तपास संस्था या देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याची चौकशी करत आहेत. 

 

पीएनबीचे सीईओ व कार्यकारी संचालकाची चौकशी 

सीबीआयने शनिवारी पीएनबीचे सीईओ सुनील मेहता तसेच कार्यकारी संचालक के.व्ही. ब्रह्माजी राव यांची चौकशी केली. घोटाळ्याची माहिती कशी मिळाली, याबाबत त्यांना विचारले. तसेच त्यासाठी निर्धारित प्रक्रिया आणि त्यांच्या उल्लंघनाचीही माहिती घेण्यात आली. 

 

तीन नव्या घोटाळ्यांवरून राहुल गांधी यांचा मोदींवर घणाघात
तीन नवे घोटाळे उघडकीस आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. मोदीजी, जन-धन योजनेअंतर्गत आणखी एक घोटाळा! ३९० कोटी रु. दिल्लीतील एक हिरे व्यापारी यात सहभागी आहे, असे टि्वट केले. 

 

केंद्र सर्व घोटाळ्यांची जबाबदारी झटकत आहे : सीताराम येचुरी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी यांनी टि्वटमध्ये म्हटले, ललित मोदी असो की पीएनबीचा घोटाळा, बिर्ला-सहारा डायरी केस असो की व्यापमं घोटाळ्यात मृत्यू पावलेल्याचे किंवा एखाद्या भ्रष्टाचाराचे प्रकरण असो, भाजप सर्वच प्रकरणांत जबाबदारी झटकते आहे.

 

चौकसीचे कर्मचाऱ्यांना पत्र : वेतन देऊ शकत नाही, वाटले तर नोकऱ्या सोडा 

गीतांजली समूहाचा प्रमुख मेहुल चौकसीने आपल्या ३५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना पत्र लिहून सांगितले आहे की, सद्य: परिस्थितीत वेतन देता येणार नाही. यामुळे वाटले तर कर्मचारी नोकरी सोडू शकतात. मेहुलच्या वकिलांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी काहीही चुकीचे केलेले नाही. शेवटी सत्याचाच विजय होईल. सर्व सरकारी संस्थांनी आमच्या कंपन्या बंद करण्यासाठी कारवाया सुरू केल्यामुळे मी खूप अडचणीत आलो आहे. तपास संस्थांनी आपली बँक खाती  व इतर मालमत्ता जप्त केली आहे. यामुळे वेतन अदा करण्यात अडचणी येत आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर मी पूर्ण थकबाकी अदा करेन.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, नीरवच्या आणखी ५२३ कोटी रुपयांच्या २१ मालमत्ता सील... 

बातम्या आणखी आहेत...