आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे जाणार विरोधकांच्या गोटात?; शरद पवार- राज ठाकरे मुलाखतीबाबत राज्यभर उत्सुकता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे २१ फेब्रुवारी राेजी पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीच्या निमित्ताने ठाकरे विरोधकांच्या आघाडीत शिरत आहेत का, अशा अर्थाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच गेल्या चार-सहा महिन्यांतील राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांमधूनही ते विरोधकांचीच भूमिका अधोरेखित करत भाजप किंबहुना मोदी-शहा जोडगोळीला लक्ष्य करत असल्याने या चर्चेला अधिकच जोर आला आहे.  


गेल्या काही दिवसांतील सरसंघचालकांचे भारतीय लष्कराबाबतचे वक्तव्य, नीरव मोदी प्रकरण, अहमदनगरच्या उपमहापौराचे छत्रपती शिवरायांबद्दलचे संतापजनक वक्तव्य अशा विविध मुद्द्यांवरून भाजप सध्या अडचणीत सापडला आहे. या मुद्द्यांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे विरोधी पक्ष आणि शिवसेनेसारखा सत्तेत सहभागी असलेल्या पक्षातर्फे भाजपवर तोंडसुख घेतले जात अाहे. राज ठाकरेही विरोधकांचीच भूमिका आपल्या व्यंगचित्रांमधून मांडत आहेत. एकेकाळी मोदींमध्ये ज्यांना देशाचे आश्वासक नेतृत्व दिसत होते त्या मोदींवरील राज ठाकरेंचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. 


अलीकडे तर राज ठाकरे हे नरेंद्र मोदींचा ‘गुजरातचे पंतप्रधान’ असा उपहासाने उल्लेख करतात.  मोदींविषयी राज यांचा मुखभंग होत असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबाबत मात्र राज यांचे मत बदलताना दिसते आहे. विशेषत: गुजरात निवडणुकीनंतर ‘राहुल गांधींची राजकीय उंची वाढल्याची’ बाब अधोरेखित करणारे त्यांचे व्यंगचित्र हे त्यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेची साक्ष देत आहे. एकीकडे तेलगू देसम, शिवसेना आणि अकाली दलाचा नाराजीचा सूर ‘एनडीए’त उमटत असताना ‘यूपीए’चे मात्र जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार, सोनिया गांधी आणि अन्य समविचारी पक्षांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. त्यातच जर राज ठाकरेंचा मनसे या आघाडीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सामील झाल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. त्यातच येत्या २१ तारखेला पुण्यात राज ठाकरे शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीद्वारे नवी राजकीय समीकरणे जुळवण्याबाबतचे काही संकेत मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  


मुलाखतीतून महत्त्वाचे संकेत मिळण्याची अाशा  
मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याचे मत जाणून घेतले असता राजकीयदृष्ट्या काहीतरी महत्त्वाचे संकेत मिळतील या शक्यतेने पक्षातही राज ठाकरे व शरद पवार मुलाखतीबाबत उत्सुकता असल्याचे हा नेता म्हणाला. सन २०१४ मध्ये भाजपसोबत थेट न जाता अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची घोषणा करून जी चूक आम्ही केली ती चूक २०१९ मध्ये होऊ नये असा एक मतप्रवाह पक्षात आहे. स्वबळाऐवजी एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षाशी समझोता करून निवडणूक लढवण्याबाबत पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने काही निर्णय घेतला तर पक्षाला त्याचा फायदा होऊ शकेल, असे सूचक विधानही केले.

बातम्या आणखी आहेत...