आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे राष्ट्रवादीचा मेळावा: आधी मोदींना सत्तेवरुन घालवू, मग नेतृत्व काेणास द्यायचे ते बघू : शरद पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- “नरेंद्र मोदींच्या विरोधात नेतृत्व न देता पर्याय कसा देणार, असा प्रश्न विचारला जातो. पण काही अवघड नाही. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांचे प्रभावी नेतृत्व होते. त्यांच्यासमोरही कोणी समर्थ पर्याय नव्हता. परंतु, जनतेने इंदिराजींचा पराभव केला. नंतर पर्यायी सरकार अस्तित्वात आले,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यांना पर्याय हवा आहे. मोदींच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   


 राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पवारांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. १०) पुण्यात झाला. त्या वेळी ते बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे खासदार-आमदार या वेळी उपस्थित होते. 

 
 पवार म्हणाले, “मी राज्या-राज्यात फिरतो आहे. लोकांना पर्याय हवा आहे. तामिळनाडूत डीएमके, केरळात कम्युनिस्ट, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, ओडिशात नवीन पटनाईक, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेशात काँग्रेस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा सगळ्यांची एकत्र येण्याची मानसिकता आहे. एकत्रितपणे लढा दिल्यास समाजातल्या मूठभरांच्या हिताची जपणूक करण्याची भूमिका असणाऱ्या भाजपचा पराभव शक्य आहे. भाजपचा आलेख खाली येतो आहे. देशातल्या दहा निवडणुकांपैकी ९ ठिकाणी त्यांचा पराभव झाला,’ असे  त्यांनी सांगितले.   


“शेतकरी आत्महत्यांचा विक्रम राज्यात झाला आहे. अशा वेळी तुम्ही काय केले असे आम्हाला विचारले जाते. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एकरकमी ७१ हजार कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली, असे पवार म्हणाले. ‘३५ हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्री सांगतात. वर्ष झाले अजून कर्जमाफी चालू आहे. कारण त्यांची देण्याची नियत नाही,’ असे पवार म्हणाले. नोटबंदी, पेट्रोल-डिझेलची महागाई, शेतमालाच्या घसरत्या किमतींमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. समाजातला एकही घटक समाधानी नसल्याची टीकाही 
पवारांनी केली.  

 

धमकीची पत्रे खोटी-

  
छगन भुजबळांना डांबून ठेवले. माजी अर्थमंत्री राहिलेल्या पी. चिदंबरम यांना अटकेत टाकण्याची तयारी चालू आहे. भीमा कोरेगावचा उद्योग कोणी केला हे सगळ्या दुनियेला माहिती असताना एल्गार परिषदेवरून अटक केली जात आहे. या सगळ्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. नक्षलवाद्यांकडून धमक्यांची पत्रे आल्याचा प्रकार खोटा असल्याचाही आरोप त्यांनी केला. 

 

‘ईव्हीएम’ला विरोध-


“विरोधकांचा पराभव होत असल्याने ईव्हीएमला विरोध होत असल्याचे निवडणूक आयुक्तांचे मत वाचले. आयुक्तांना विनंती आहे की,  गोंदिया-भंडारात विजय झाल्यानंतरही आम्ही तक्रार केली आहे. या निवडणुकीत ६४ यंत्रे बंद असल्याचे पत्र निवडणूक आयोगानेच आम्हाला दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका ईव्हीएमने नको. नेहमीच्या पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे,’ अशी सूचना पवारांनी केली.

बातम्या आणखी आहेत...