आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती टिकवण्यासाठी भाजपच्या ऑफरबाबतचे वृत्त शिवसेनेने फेटाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभा त्रिशंकू स्थितीत असेल आणि भाजपला सध्या ताब्यात असलेल्या शंभर ते एकशे दहा जागांवर पराभव पत्करावा लागेल, असे भाकीत एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. केंद्र सरकारमधून बाहेर पडलेल्या तेलगू देसम पक्षाकडे असेलली मंत्रिपदे आणि राज्यात एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री पदांची ऑफर भाजपने शिवसेनेला दिल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला आहे. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना भाजपच्या संबंधांमधील तणाव निवळल्याच्या बातम्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.  


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर दोन्ही पक्ष युतीबाबत आपापल्या सोयीची भूमिका मांडत असल्याने राजकीय पटलावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे शहांच्या भेटीनंतरही आपल्या भूमिकेत फारसा बदल झाला नसल्याचे दावे शिवसेनेकडून करण्यात येत आहेत, तर भाजपच्या प्रयत्नांना उद्धव ठाकरेंनी चांगला प्रतिसाद दिल्याचा भाजपचा दावा आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी उद्धव यांनी पालघरमध्ये घेतलेल्या आभार सभेतही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हे श्रीनिवास वनगाच असतील, असे जाहीर करत आपला स्वबळाचाच दावा अप्रत्यक्षरित्या कायम ठेवला आहे.

 

तर युती टिकवण्याबाबत शिवसेना सकारात्मक असल्याच्या प्रसारमाध्यमांमधील बातम्यांचे खंडन करतानाच शिवसेना आपल्या मूळ भुमिकेवरच ठाम असल्याचे दावे करत राऊत यांनीही तशाच स्वरूपाचा प्रयत्न चालवला आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनीही  “बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत दोन्ही नेत्यांनी कोणतेही भाष्य केलेले नसल्याने, प्रसारमाध्यमांमधील बातम्यांबाबत चर्चा करण्यात अर्थ नाही,’ अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यामुळे पुन्हा दोन्ही पक्षांची युती होईल की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू  आहे.

 

दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांत मात्र गोंधळाचे वातावरण 
कोणत्याही परिस्थितीत युतीबाबत भाजपला शिवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा संदेश जनतेत जाणार नाही, याची काळजी शिवसेनेतर्फे घेतली जात असल्याचे चित्र आहे. तर ठाकरे - शहा चर्चा आपल्या बाजूने झुकल्याचे दाखवण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने केला जात आहे. एकूणच युती झाली तर आपला त्यात वरचष्मा असावा, या हेतूने दोन्ही बाजूने डावपेच आखत पावले टाकली जात आहेत. मात्र, त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...