आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेराेजगारीमुळे नगरच्या निराश युवकाचा मंत्रालयापुढे आत्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी नैराश्यातून मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मागच्या पंधरवड्यात धुळ्याचे धर्मा पाटील, सोलापूरचे सदाशिव घावते यांची प्रकरणे ताजी अाहेत. त्यात बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाची भर पडली. नेवासे तालुक्यातील अविनाश शेटे (३३) या सुशिक्षित बेराेजगार तरुणाने नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशदारी अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. 


बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गार्डन गेटसमोर ही घटना घडली. नेवासे तालुक्यातील गाेणे गावचा अविनाश विठृठल शेटे हा आपली कैफियत घेऊन मंत्रालयात आला होता. आकाशवाणीकडील गार्डन गेटच्या रांगेत तो पाससाठी उभा होता. काही वेळाने तो सरळ गेटसमोर आला आणि जोराने ओरडू लागला. काही कळायच्या आता जवळच्या कॅनमधील राॅकेल त्याने स्वत:च्या अंगावर ओतूनही घेतले. गेटवरील पोलिसांनी त्याला तत्काळ रोखले. त्यानतंर मरीन लाइन्स पोलिस त्याला चौकशीसाठी घेऊन गेले. 

 

काय आहे प्रकरण ?
अविनाशने २०१३ मध्ये कृषिसेवक पदाची परिक्षा दिली होती. मात्र निकालात तो नापास झाला. आपल्याकडे अपंगाचे प्रमाणपत्र आहे. मात्र, त्याबाबत कृषी आयुक्ताकडे तक्रार झाली होती. त्यामुळे आपल्याला अपात्र ठरवण्यात आले. तसेच कृषिसेवक पदाच्या परिक्षेमध्येही गैरव्यवहार झाला आहे, असे अविनाशचे आरोप आहेत. 

 

अपात्र ठरूनही चकरा
एमपीएससीकडून २०० गुणांची कृषिसेवक पदाची परीक्षा घेतली जाते. त्यात पात्रतेसाठी ४५% गुण लागतात. मात्र अविनाशला केवळ ७७ गुण मिळाले. त्यामुळे तो मुलाखतीसाठी अपात्र ठरला होता. तरीही तो कृषी आयुक्तालय तसेच कृषी राज्यमंत्र्यांकडे चकरा मारत होता, अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्याने दिली.

 

काँग्रेसकडून टीका
राज्यातील शेतकरी मंत्रालयात आत्महत्या करत असताना त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता फडणवीस सरकार राज्यातील जनतेसोबत ब्ल्यू व्हेल गेम खेळत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारच्या प्रकरणानंतर केली आहे.

 

मंत्रालयाची सुरक्षा वाढवणार

धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्यनंतर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था अद्यावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंत्रालयात अंतर्गत ठिकाणी ४३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर बूम बॅरियर्स व बोलार्डस हे अत्याधुनिक फाटक बसवले जाईल. त्यामुळे प्रवेशद्वारातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे स्कॅनिंग होईल. तसेच अभ्यगतांना जलद पास वितरित होण्यासाठी नवी व्यवस्थाही राबवण्यात येईल, अशी  माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. 

 

पुन्हा तपासणार पेपर  : कृषीमंत्री
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी अविनाशला आपल्या दालनात बोलावून घेत त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. यावेळी अविनाशसोबत त्याचे वडील होते. कृषिमंत्र्यांनी कृषी आयुक्तालयाला याप्रकरणाची नस्ती सोमवारी मंत्रालयात घेऊन येण्याचे निर्देश दिले. आत्महत्या हा मार्ग होऊ शकत नाही, असा राग डोक्यात घालू नकोस, तुला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू,जीव लाखमोलाचा आहे, अशा शब्दात कृषीमंत्री फुंडकर यांनी त्याची समजूत काढली. आपल्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी अशी अविनाशची मागणीही  फुंडकरांनी मान्य केली.

बातम्या आणखी आहेत...