आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांची संघटना फुटली, समांतर कार्यकारिणी जाहीर; शिवाजी साखरे गटाचे बंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिक्षकांच्या संघ आणि समिती या दोन शक्तिशाली राज्यव्यापी संघटना मानल्या जात होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कच्छपी लागून २००७ मध्ये संघ संघटना दुभंगली. आता तोच प्रकार समितीतही घडत आहे. अध्यक्षपद नाकारल्याने नाराज झालेल्या लातूरच्या शिवाजी साखरे गटाने पुण्यात नुकतीच समांतर कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या राज्यव्यापी-एकसंध अशा संघटनेत फूट पडली आहे. संघटना दुभंगल्याने  सरकारवरचा दबाव ओसरणार असून त्याचा परिणाम शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहण्यावर होणार आहे.    


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सिंधुदुर्गमध्ये नुकतेच १६ वे त्रैवार्षिक अधिवेशन झाले. त्यात विषय नियामक बैठकीत अध्यक्षाच्या निवडीवर पहाटेपर्यंत एकमत होऊ शकले नव्हते. दुसऱ्या दिवशी विद्यमान गटाने साताऱ्याचे उदय शिंदे यांना घाईघाईने अध्यक्ष जाहीर केले. त्याला लातूरचे शिवाजी साखरे यांनी आक्षेप घेतला व स्वत:ला अध्यक्ष जाहीर केले होते. तरीसुद्धा दोन्ही गट चर्चा करून मतभेद सोडवतील अशी लाखो शिक्षक सदस्यांची आशा होती. बा. वा. शिंपी संस्थापक असलेली समिती राजकीय पक्षांबाबत तटस्थ संघटना मानली जाते. राज्यातील ६० टक्के शिक्षक  समितीचे सदस्य आहेत. अलीकडे पुण्याचे नाना जोशी, सांगलीचे विश्वनाथ मिरजकर आणि नाशिकचे काळुजी बोरसे -पाटील यांचे समितीत प्रस्थ बरेच वाढले होते. संघटनेचा सुकाणू हाती ठेवण्यासाठी या बुजुर्ग त्रिकुटाचा आटापिटा होता. त्यांनी साखरे यांचा पत्ता कापून शिंदे यांची वर्णी लावल्याचा नाराज गटाचा आरोप आहे. सरकार सध्या ८० हजार शाळा बंद करायला निघाले आहे, त्यातून शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर होणार आहे, अशा पडत्या काळात शिक्षकांच्या राज्यव्यापी संघटनेत फूट पडणे भूषणावह नाही. परिणामी संघटनेचा दबदबा कमी होणार असून शिक्षकांच्या प्रश्नांचे निराकरण यापुढच्या काळात कठीण होत जाईल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.  

 

नाराजांची समजूत काढणार  
आपल्याला २५ जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा अाहे, असे समांतर कार्यकारिणी जाहीर केलेले शिवाजी साखरे सांगत आहेत. सिंधुदुर्ग अधिवेशनातील नियामक बैठकीत सर्वानुमते नव्या निवडी जाहीर झाल्या आहेत, असे नूतन अध्यक्ष उदय शिंदे यांचे म्हणणे आहे. समिती आजही एकसंध आहे, नाराजांची समजूत काढण्यात येईल, असे समितीचे शिक्षक नेते काळुजी बोरेसे - पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. 

 

फुटीमागे समितीमधील कोट्यवधींचे अर्थकारण  
 साखरे गटाने नुकतीच पुण्यात बैठक घेतली. त्यात नाराज गटाने समांतर राज्य कार्यकारिणी जाहीर केली. बरोबर दहा वर्षांपूर्वी २००७ मध्ये शिक्षक संघात अशीच फूट पडली होती. त्यातून शिवाजी पाटील आणि संभाजी थोरात असे दोन स्वतंत्र गट उदयास आले होते. त्यानंतर दशकभरातच एकसंध मानल्या जाणाऱ्या समितीलाही फुटीस सामोरे जावे लागले. समितीमधील फुटीमागे संघटनेतील करोडो रुपयांच्या निधीचे अर्थकारण कारणीभूत असल्याचे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...