आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाला कबड्डी दिली त्यांची घटना नाही!; राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक धोक्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशालाच नव्हे तर तमाम विश्वाला कबड्डीची आदर्श शिकवण आणि संघटनाचे धडे देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची स्वत:ची, कायमस्वरूपी आणि पारदर्शी घटना नाही. संघटनेच्या एकाच पदासाठी जेव्हा झुंजायची वेळ आली त्या वेळी आपली घटना योग्य नसल्याची सोयीस्कर जाणीव त्यांना झाली. ती कल्पना त्यांनी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या अजितदादा पवार यांच्या गळी उतरवली आणि निर्वाचन अधिकारी राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यालयात उमेदवारांच्या अर्जाची प्रतीक्षा करीत असताना, तेथे  कमालीची शांतता दिसून आली.  


 निवडणुकीत सत्ताधारी गटाला आव्हान देणाऱ्या गटाने आपल्या सर्व उमेदवारांच्या अर्जासोबत माघार पत्रेही दिली आहेत. १७ मे या माघारीच्या मुदतीपूर्वी सत्ताधारी गटाचे उमेदवारही अर्ज मागे घेणार असल्याचे कळते. पदांच्या वाटचालीत तडजोड न झाल्यामुळे या दोन गटांना निवडणुकीच्या तोंडावरच साक्षात्कार कसा झाला? सोयीनुसार वापरावयाच्या या घटनांमध्ये किती वैधता आहे? एकदा का निवडणूक जाहीर झाली की ती रद्द करण्याचा अधिकार कुणाला आणि कसा पोहोचतो?  


नजीकच्या काळात तयार करण्याची घटना, त्यातील मुद्दे याचा विचार राज्य संघटनेने केला आहे का? गेल्या कित्येक दशकांमध्ये राज्य संघटनेला न करता आलेले घटना तयार करण्याचे काम काही महिन्यांतच कसे करता येणार आहे? त्याबाबतची योजना तयार आहे का? आदी प्रश्न महाराष्ट्रातील कबड्डीरसिकांना पडले आहेत.

  
‘प्रो कबड्डी’च्या माध्यमातून गहलोत आणि कंपनीने देशातील कबड्डीचे सुकाणू आपल्या दिशेला वळवले. खुर्चीसाठी आपापसात लढणाऱ्या राज्यातील कबड्डी संघटकांनी महाराष्ट्राची मक्तेदारी कशी संपुष्टात आली आहे, याचा विचार व कृती केली आहे का? आपसात लढण्यापेक्षा राज्यातील खेळाडूंसाठी संघर्ष केला आहे का? त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी संघटना पुढे आली का? एकमेकांशी झुंजण्यापेक्षा महाराष्ट्राच्या कबड्डीच्या शत्रूंविरुद्ध त्यांनी दंड थोपटले का?

 

११ जणांची माघार; अंतर्गत नियोजनचा अभाव
देशातील कबड्डीवरची पकड ढिली पडली आहेच; परंतु राज्यातील अंतर्गत कबड्डीचे नियोजनदेखील नीट होत नाही.  दरम्यान  दत्ता पाथ्रीकर (कार्याध्यक्ष), श्रीरंग बंडाळे व अमरसिंह पंडित (उपाध्यक्ष), दिनकर पाटील व मनोज पाटील (सहकार्यवाह),बाळासाहेब पाटोळे , नितीन शिंदे, नवनाथ लोखंडे, मनोज पाटील, गणेश शेट्टी, मनोज पाटील या अशा ३४ पैकी ११ उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज मागे घेतले.

 

बातम्या आणखी आहेत...