आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग लागलेला मुंबईमधील फरसाणचा कारखाना बेकायदा; चौकशी अहवालात ठपका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कमला मिल कंपाउंडच्या आगीने मुंबई महापालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असताना यात फरसाण कारखान्याला लागलेल्या आग दुर्घटनेच्या चौकशी अहवालाची भर पडली आहे. आयुक्तांना बुधवारी या आगीचा अहवाल सुपूर्द केला. १२ कामगारांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेला साकीनाका येथील भानू फरसाण कारखान्याला दिलेल्या परवानगीत मोठी अनियमितता झाल्याचे उघड झाले असून मुंबई महापालिकेची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

  
१८ डिसेंबर रोजी भानू फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाला होता. आयुक्तांना सादर केलेल्या अहवालात स्वच्छता निरीक्षक, इमारत विभागाचे अभियंता व इमारत मुकादम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला अाहे. तसेच त्यांच्या चौकशीची आणि निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. कमला मिलच्या आगीनंतर पालिकेने जशी धडक कारवाई हाती घेतली, तशी फरसाण कारखान्याच्या दुर्घटनेनंतर घेतली नसल्याचा ठपका पालिका प्रशासनावर ठेवण्यात आला होता.   

 

मोठी अनियमितता उघड  
अधिकृत नळ जोडणी दिली नसताना तेथे कारखान्यात नळ सापडले. दुकाने व आस्थापना विभागाची दोन वेगवेगळी नोंदणीपत्रे आढळली. अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नव्हते. पोटमाळ्याचा निवासासाठीचा वापर बेकायदा होता. व्यावसायिक कारणासाठी वापर असताना मालमत्ता कर निवासी भरला जात होता. आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नव्हते आदी अनियमितता फरसाण कारखान्यात आढळून आल्या आहेत.  

 

> फरसाण दुकानाला लागलेल्या आगीप्रकरणी मालक रमेश भानुशालीला अटक केली आहे. सुमारे ४० वर्षे जुन्या असलेल्या या दुकानाच्या गाळ्यावर भानुशालीने कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी अनधिकृत बांधकाम केले होते.

 

प्रशासनाच्या उलट्या बोंबा  
फरसाण कारखान्यास लागलेली आग शाॅर्टसर्किटमुळे लागली होती. जरी तेथे अनियमितता असली तरी आगीची जबाबदारी महापालिका किंवा पालिका कर्मचारी यांच्यावर टाकता येणार नाही, असे पालिकेच्या उपायुक्तांकडून करण्यात आलेल्या या चौकशी अहवालात म्हटलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...