आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणातील नाणार येथे प्रस्तावित रिफायनरीला विराेधासाठी उद्धव ठाकरे थेट ‘वर्षा’वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘कोकणातील नाणार येथे प्रस्तावित रिफायनरीसाठी ७० टक्के ग्रामस्थांची मंजुरी आवश्यक आहे. परंतु जर त्यापेक्षा जास्त ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अाम्हाला दिले अाहे, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. या प्रकल्पाला शिवसेनेचा विराेध अाहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी प्रकल्पग्रस्तांसह ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान, सत्तेत एकत्र असूनही एकमेकांवर टीकेची एकही संधी न साेडणाऱ्या फडणवीस-ठाकरे यांच्या या भेटीचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात अाहेत.  


‘नाणार येथे शिवसेनेच्या मंत्र्यांमुळेच रिफायनरी होत आहे’ असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यामुळे काेकणातील हक्काचा मतदार असलेलेे प्रकल्पग्रस्त शिवसेनेच्या विरोधात जात होते. शिवसेनेच्या एका गटाचा या रिफायनरीला विरोध होता. अशाेक वालम या स्थानिक कार्यकर्त्याने प्रकल्पाला विराेध करत  कोकण रिफायनरी विरोध संघर्ष समितीची स्थापना केली हाेती. मात्र हा विराेध करू नये म्हणून काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी धमकी दिल्याचा अाराेपही वालम यांच्या मुलाने केला हाेता. ग्रामस्थांचा राेष वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांसाेबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यापूर्वी दुपारीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये नाणार प्रकल्पाबाबत कोणताही करार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. ‘वर्षा’वर गेलेल्या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी व सचिव मिलिंद नार्वेकर होते. या वेळी ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला सेनेचा विरोध असल्याचे सांगत विरोध दर्शवणाऱ्या ग्रामस्थांच्या पत्रांचे गठ्ठे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. दरम्यान, बैठकीनंतर ठाकरे म्हणाले, ‘प्रकल्पग्रस्तांचा विरोध पाहून मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नसल्याचे आश्वासन दिले अाहे.’   

 

बंद दाराआडच्या चर्चेत काय?   
फडणवीस आणि ठाकरे यांनी बंद दाराआड १५ ते २० मिनिटे चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले. प्रकल्पाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत शिवसेना- भाजपच्या संबंधाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. बैठकीला उपस्थित सेना नेत्यास विचारले असता ‘युतीची चर्चा १०-१५ मिनिटात होते का’ असा प्रतिसवाल त्यांनी केला. ‘ही बैठक फक्त रिफायनरीसंदर्भात होती. बंद दाराआड काय झाले हे फक्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच सांगू शकतात. तुम्ही त्यांनाच विचारा,’ असेही या नेत्याने म्हटले.

 

नाणार प्रकल्पाबाबत स्थानिकांचे म्हणणे काय?

रत्नागिरी जिल्ह्यातला नाणारमधल्या रिफायनरी प्रकल्पामुळे येथील आंबा, काजू आणि नारळ शेतीची वाट लागणार आहे. तसेच देवगड येथील देवगड हापूसलाही याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच मासेमारीवरही या प्रकल्पाचा भविष्यात परिणाम दिसून येईल. कारण या प्रकल्पातून रासायनिक पाणी सोडल्यानंतर त्याचा हा धोका मासेमारी व्यवसायाला पोहोचणार आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...