आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाख मेले तरी चालतील पण लाखोंचे पोशिंदे जगलेच पाहिजे- PM, CM सुरक्षेवरून उद्धव यांची उपरोधिक टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांभोवती अभेद्य सुरक्षा कवच उभारणीवर जोर द्यावा लागेल. राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्या हत्येतून आपण धडा घेतला पाहिजे. देशाने दोन थोर नेते अशा हिंसाचारात गमावले आहेत. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणतेही राजकारण कोणीच करू नये. राष्ट्राचे व राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचे रक्षण व्हायलाच हवे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. मात्र या हत्या कटाचा जो उत्सव आपल्या राजकीय मतलबासाठी सुरू आहे तो निषेधार्ह आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी-फडणवीसांच्या सुरक्षेवरून भाजपवर उपरोधिक टीका केली आहे. 

 

पुणे पोलिसांनी भीमा–कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना नुकतीच अटक केली. हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी– फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते, असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला. यानंतर मोदी- फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा देशभर रंगू लागल्या. मात्र, यात काही विसंगती असल्याचे समोर येताच विरोधी पक्षांनी यावर शंका उपस्थित केल्या. आता शिवसेनेनेही यावर 'हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत' अशी टीकाटिप्पणी करत भाजपवर शरसंधाण साधले. 

 

आणखी काय काय म्हणाले उद्धव ठाकरे आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात-

 

- पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय व मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल. कारण पुन्हा तेच. लाख मेले तरी चालतील (तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत. आम्ही मोदी व फडणवीस यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत.

 

- पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या स्वदेशात नाहीत म्हणजे परदेश दौऱयावर आहेत. फडणवीस हे अमेरिका, कॅनडा वगैरे देशांत उद्योगपतींना भेटण्यासाठी गेले आहेत, तर मोदी आज चीनला आहेत, पण उद्या कोणत्या परकीय भूमीवर असतील ते सांगता येत नाही.

 

- नक्षलवाद्यांच्या कारवायांना भारिप बहुजन महासंघाचे ऍड. प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसमधील काही लोकांची सहानुभूती असल्याचे समोर आले आहे व त्याबद्दल भाजपने चिंता व्यक्त केली आहे. निवडणुकांच्या तोंडावर राज्यकर्त्यांच्या हत्याकटांचे स्फोट नेहमीच होत असतात, पण महाराष्ट्रात व देशात निवडणुकांना अवकाश आहे. तरीही कट उघड झाला म्हणून आम्हाला चिंता वाटते. 

 

- पंतप्रधान मोदी यांनी त्यांची सुरक्षा ‘मोसाद’च्या धर्तीवर बनवली आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था भेदून आकाशात एखादे पाखरूही फडफड करू शकणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर मंत्रालयालाच सुरक्षेचा किल्ला बनवल्याने तिथे सामान्य जनतेचे येणे-जाणे थांबले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक कट उघड केला जातो व त्यातून हे थरारक प्रकार बाहेर येतात हे एखाद्या रहस्यमय आणि हॉरर सिनेमाच्या पटकथेप्रमाणे आहे. 

 

- एका बाजूला चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेले ‘एम-४’ हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लॅन नक्षलवादी करतात व त्याच वेळेला मोदी-फडणवीस यांना मारण्याचा कट रचणारे एक पत्र पुरावा म्हणून मागे सोडतात हे कारस्थान पटणारे नाही अशी शंका आता तज्ञांनी उपस्थित केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...